इंटेलचे चालू वर्षी कर्मचारी कपातीचे संकेत
खर्च कपात, पुनर्रचनेमुळे निर्णय : 24,000 जणांचे रोजगार जाणार?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील सर्वात मोठ्या सेमीकंडक्टर कंपन्यांपैकी एक असलेली इंटेल या वर्षी तिच्या कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांश पेक्षा जास्त म्हणजेच 24,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना (32.66टक्के) काढून टाकणार असल्याचे सांगितले जात आहे. नवीन सीईओ लिप-बू टॅन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने मोठ्या प्रमाणात खर्चात कपात आणि पुनर्रचनेची घोषणा केली आहे.
यासोबतच, इंटेलने जर्मनी आणि पोलंडमधील त्यांचे महत्त्वाचे विस्तार प्रकल्प देखील रद्द केले आहेत. कारण कंपनी आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा आणि बाजारपेठेत स्पर्धा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. 2024 च्या अखेरीस, इंटेलची एकूण कर्मचारी संख्या 99,500 होती. तथापि, कपातीनंतर 2025 च्या अखेरीस ही संख्या 75,000 पर्यंत कमी होणार असल्याची शक्यता आहे.
कठीण पण आवश्यक निर्णय
कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, सीईओ टॅन यांनी कंपनीच्या निर्णयाचे वर्णन एक कठीण आणि आवश्यक निर्णय म्हणून केले. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत, कंपनीने प्रथम त्यांची व्यवस्थापन पातळी निम्मी केली आणि त्र्1.9 अब्ज किंवा 16,450 कोटी रुपयांचा पुनर्रचना खर्च नोंदवला.
असेंब्ली, चाचणी सुविधा बंद
इंटेलने 3,000 कर्मचाऱ्यांसाठी जर्मनीमध्ये प्रस्तावित मेगा-फॅब आणि 2000 कर्मचाऱ्यांसाठी पोलंडमध्ये असेंब्ली आणि चाचणी सुविधा रद्द केली आहे. हे प्रकल्प 2024 मध्ये दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आले होते.
चिप कारखाना 2030 पर्यंत पूर्ण
कंपनीचा ओहायो, अमेरिकेतील 28 अब्ज डॉलर्स (2.42 लाख कोटी रुपये) चा चिप कारखाना, जो 2025 पर्यंत पूर्ण होणार होता, आता तो बाजारातील मागणीनुसार हळूहळू बांधला जाईल आणि त्याचे काम 2030 नंतर पूर्ण होईल.
मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना काढल्याचा दावा फेटाळला
अमेरिकन टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने 9,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचा आणि एकाच वेळी हजारो एच-1बी व्हिसा अर्ज दाखल केल्याचा आरोप खोटा ठरवला आहे. सीईओ सत्या नाडेला नाडेला म्हणाले की आमच्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत कोणताही बदल झालेला नाही, टाळेबंदीचे सर्व दावे खोटे आहेत.