आयएनएसव्ही ‘कौंटीण्य’ नौदलात दाखल
भारताच्या सागरी पुनरुत्थानातील ऐतिहासिक पाऊल : पाचव्या शतकातील आठवणींना उजाळा
कारवार : दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठा आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा व अतिशय महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखला जाणारा येथून जवळचा सीबर्ड नाविक दल बुधवारी आणखी एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. कारण बुधवारी सीबर्ड प्रकल्पस्थळावर केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते आयएनएसव्ही कौंटीण्य जहाज नौदलात दाखल करण्यात आले. या ऐतिहासिक घटनेने पाचव्या शतकातील आठवणींना उजाळा देण्यात आला. कौंटीण्य लोकार्पण भारताच्या सागरी पुनरुत्थानातील ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. याशिवाय भारताच्या सांस्कृतिक आणि सागरी पुनरुत्थानाच्या दिशेने एक महत्त्वाचा क्षण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.
मंत्री शेखावत यांच्या हस्ते जेंव्हा अत्यंत कुशलतेने बांधलेली आयएनएसव्ही कौंटीण्य नौका भारतीय नौदलात दाखल करण्यात आली, तेव्हा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेल्यांच्या आनंदाला आणि अभिमानाला पारावर उरला नाही. अत्यंत आगळी वेगळी आणि नावीन्यपूर्व टाके-प्लान्क कौंटीण्य नौका पाचव्या शतकातील अजिंठा लेण्यामधील चित्रापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेली आहे. ही अनोखी नौका भारतीय प्राचीन नागरी परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक प्रमाणिकरणाचा सुंदर संगम आहे. कौंटीण्य हे नाव एक आख्यायिका असलेल्या भारतीय नाविकाच्या नावावरून देण्यात आले आहे. त्या भारतीय नाविकाने हिंदी महासागरातून दक्षिण-पूर्व आशियापर्यंत प्रवास केला होता. हे नाव भारताच्या प्राचीन सागरी देवाण-घेवाणीची परंपरा नौकानयन आणि सागरी सामर्थ्याचे प्रतीक आहे.
संजीव सन्याल यांची संकल्पना
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. भारतीय संस्कृती मंत्रालय, भारतीय नौदल आणि मेसर्स होडी इनोव्हेशन्स, गोवा यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला आहे.
फेब्रुवारीमध्ये झाले होते जलावतरण
मास्टर शिपराईट बाबू शंकरन यांनी पारंपरिक कोयर स्टिचींग या तंत्राचा वापर करून या जहाजाची निर्मिती केली आहे. या जहाजाचे यशस्वी जलावतरण फेब्रुवारी 2025 मध्ये झाले होते. कोणतेही मूळ आराखडे नसताना भारतीय नौदल आणि मद्रास येथील आयआयटीने जहाजाची रचना आणि समुद्र योग्यता यांची कठोर तपासणी करून प्रमाणित केले.
प्राचीन व्यापारी मार्गावरून प्रवास करणार
गंडभेरुंड आणि सिंहयाली या मोटीप्सने सुशोभित आणि हडप्पाकालीन नगरासारखे दिसणारे कौंटीण्य हे भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक आहे. ही नौका लवकरच आपल्या पहिल्या प्रवासाला निघणार आहे. प्राचीन व्यापारी मार्गावरून प्रवास करून भारताचा श्रीमंत वारसा आणि सांस्कृतिक ठेवा पुन्हा एकदा स्थापित करेल, अशी अपेक्षा आणि आशा बाळगुया. लोकार्पण सोहळ्यावेळी कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, व्हाईस अॅडमिरल राजाराम स्वामीनाथन, रियर अॅडमिरल के. एम. रामकृष्णन आदी उपस्थित होते.