शेतकऱ्यांकडून मका खरेदीची डिस्टिलरीजना सूचना
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेंगळूरमध्ये बैठक
बेंगळूर : केंद्र सरकारने निश्चित केलेल्या इथेनॉल कोट्यानुसार कोणत्या डिस्टिलरीजनी किती मका खरेदी करावा याबद्दल कृषी बाजारपेठ खात्याने यापूर्वीच सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार डिस्टिलरीजनी मका खरेदी करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. मका दरात घसरण झाल्याने राज्यातील मका उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी डिस्टिलरीजच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. केंद्र सरकारने सर्व धान्य आधारित डिस्टिलरीजना नाफेड/एनसीसीएफद्वारे मका खरेदी करण्यासाठी यापूर्वीच एसओपी जारी केली आहे. त्यानुसार डिस्टिलरीजना काम करावे लागेल.
केंद्र सरकार इथेनॉल कोटा व मक्यासाठी किमान आधारभूत दर ठरविते. असे असताना राज्य सरकारने मका उत्पादकांच्या मदतीसाठी पावले उचलली आहेत, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. मी अलिकडेच पंतप्रधानांची भेट घेऊन राज्यातील ऊस उत्पादक, साखर कारखाने व डिस्टिलरीजना येणाऱ्या समस्यांची माहिती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. डिस्टिलरीजना शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावर आता डिस्टिलरीजना निर्णय घ्यावा लागेल. इथेनॉलची किमान आधारभूत किंमत वाढविण्याची विनंती केंद्र सरकारकडे सातत्याने केली जात आहे. 2020 पासून हा दर वाढविलेला नाही. तथापि, याच कालावधीत मक्याचा आधारभूत दर वाढविण्यात आला आहे. यामुळे डिस्टिलरीजचे नुकसान होत आहे, असे डिस्टिलरीजच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.