बेळगाव-सौंदत्ती रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांची पत्रकारांना माहिती, बेंगळूर-बेळगाव वंदे भारत लवकरच
बेळगाव : बेळगावसह आसपासच्या नागरिकांमधून बेंगळूर-बेळगाव वंदे भारतची मागणी होत आहे. बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार बेळगावपर्यंत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर लवकरच बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावमध्ये दाखल होईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी व्यक्त केला. सोमवारी बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर रेल्वे राज्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पुणे-हुबळी, तसेच कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनासाठी आपण बेळगाव, कोल्हापूर दौऱ्यावर आलो आहे. भविष्यात प्रवाशांना रेल्वेचा वेगवान प्रवास करता यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी पाऊल उचललेल्या बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या मार्गावरूनही लवकरच रेल्वे धावेल, असे त्यांनी सांगितले.
भाविकांना रेल्वेसेवा होणार सोयीची
कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थान रेल्वेसेवेने जोडावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी निर्देश दिले असून सर्वेक्षण केले जाणार आहे. यामुळे भाविकांना दर्शनासाठी रेल्वेने दाखल होणे सोयीचे होईल. बेळगाव-मुंबई मार्गावरही एखादी स्पेशल रेल्वे सोडता येईल का? यासाठी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.