पाटील गल्लीतील गटारी स्वच्छ करण्याबाबत सूचना
बेळगाव : अंबाभुवन ते पाटील गल्ली दरम्यानच्या रोडवरील गटारी तुंबल्या असल्या तरी त्या स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शुक्रवारी मनपाच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी या मार्गावरील संबंधित व्यवसायिकाना गटारी स्वच्छ करण्याबाबत तंबी दिली. दोन दिवसात स्वत:हून गटार स्वच्छ न केल्यास मनपाच्या वतीने जेसीबी लावून स्वच्छ करण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला. अंबाभुवन ते पाटील गल्ली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिकन- मटन त्याचबरोबर हॉटेल्स आहेत. त्यामुळे दुकानातील आणि हॉटेलमध्ये सांडपाणी गटारीत सोडले जाते. पण, मार्गावरील सांडपाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने ठीकठिकाणी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मधील लोकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्याकडे लोकांनी तक्रारी केल्याने त्यांनी व्यवसायिकाना गटारी स्वच्छ करण्याबाबत सूचना केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांनी ही महापालिका अधिक्रायाना दिली. त्यामुळे अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी शुक्रवारी पाटील गल्लीला भेट देऊन व्यवसायिकांना तातडीने गटारी स्वच्छ करण्याबाबत सूचना केली. ज्या व्यवसायिकानी गटारीवर काँक्रीट घातले आहे. ते तातडीने हटवून गटारी स्वच्छ करण्याबाबत सूचना केली.