आमदार निवासासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना
पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणार : कित्तूर चन्नम्मा उत्सवात छायाचित्रांचे प्रदर्शन : विधानपरिषद सभा अध्यक्षांची सूचना
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी आमदारांना निवासाची व्यवस्था करण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर फरीद व विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. सुवर्ण विधानसौधमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठकीत तयारीचा आढावा घेतल्यानंतर सुवर्ण विधानसौध परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधीही चर्चा करण्यात आली आहे. बैठकीनंतर सभाध्यक्ष व सभापतींनी पत्रकारांना ही माहिती दिली असून आमदार निवास उभारणे व पाणीपुरवठा संबंधी आवश्यक प्रस्ताव देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.
लवकरात लवकर आमदार निवासासंबंधीचा प्रस्ताव पाठवून देण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या काळात सुवर्ण विधानसौध परिसरात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांसाठी स्थळ निश्चिती करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाली. कित्तूर चन्नम्मांच्या विजयोत्सवाला 200 वर्षे पूर्ण झाली आहेत. अधिवेशनाच्या काळात यासंबंधी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या खर्चात काटकसर करण्यात येणार आहे. अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी अधिकवेळ दिला जाणार आहे. या अधिवेशनात सकारात्मक चर्चा घडण्याची आशाही सभाध्यक्ष व सभापतींनी व्यक्त केली. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.