रुद्रकेसरी मठात दुर्गादेवीची प्रतिष्ठापना
बेळगाव : श्री रुद्रकेसरी मठ, सैनिकनगर, गणेशपूर, बेळगाव येथे दरवर्षीप्रमाणे सोमवारी दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली. रविवार दि. 21 सप्टेंबर रोजी राकसकोप रोड-गणेशपूर येथील गणेश मंदिरपासून दुर्गादेवीची मिरवणूक काढण्यात आली. श्री रुद्रकेसरी मठाचे मठाधिपती प. पू. श्री हरिगुरु महाराज, भाजप ग्रामीण विभागाचे अध्यक्ष धनंजय जाधव, ब्रह्मानंद मिरजकर यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. प्रथम वीणाधारी, त्यामागे तुळशीकट्टा व कलश घेतलेल्या चंदगड तालुक्यातील रुक्मिणी महिला भजनी मंडळाचा सहभाग होता. भारतीय संस्कृती व परंपरेचे प्रतिक असलेले लेझीम, लोकनृत्य, महिला लेझीम पथक, बेळगाव येथील मुलींच्या प्रभावी लेझीम सादरीकरणाने मिरवणूक पुढे चालली. या सर्वांना बसवण्णाप्पा वाद्य पथकाची साथ लाभली. यावर्षी जगभरात गाजलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ व ‘नारीशक्ती स्वरुपा’विषयीचे संदेश देणारे फलक महिलांनी हाती घेतले होते. रात्री 10 वा. मिरवणूक मठामध्ये पोहोचली. मिरवणुकीसाठी योग्य बंदोबस्त दिल्याबद्दल हरिगुरु महाराजांनी कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद वणकुंद्रे यांचे आभार मानले. नवरात्रीनिमित्त मठामध्ये दुर्गादेवीची स्थापना केली असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. दररोज संध्याकाळी महाप्रसाद होत असून स्वत: हरिगुरु महाराज महाप्रसाद करण्यासाठी साहाय्य करत आहेत.