For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिलारी परिसरात जलाशयासाठी लवकरच पाहणी

11:39 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिलारी परिसरात जलाशयासाठी लवकरच पाहणी
Advertisement

खासदार शेट्टर-आमदार राजेश पाटील यांची संयुक्त बैठक : शेतकऱ्यांना उपलब्ध करणार पाणी

Advertisement

बेळगाव : तिलारी जलाशयाच्या बाजूला आणखी जलाशये झाल्यास त्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबरच मार्कंडेय नदी परिसरातील कर्नाटकमधील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तर किटवडे जलाशय निर्माण झाल्यास गडहिंग्लज आणि संकेश्वर येथील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांना दिली. यासाठी संयुक्तपणे लवकरच सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्किट हाऊस येथे बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. माजी नगरसेवक संघटनेच्या माध्यमातून चंदगडच्या आमदारांबरोबर प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ही बैठक पार पडली आहे. विद्युत उत्पादनासाठी पाणी मिळू शकते. मात्र शेतकऱ्यांना पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. शेतकरी महाराष्ट्रातला असो किंवा कर्नाटकातला असो, जर या सीमावर्ती भागामध्ये संयुक्तपणे जलाशये झाली

तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यासाठी कर्नाटकने तीन टीएमसी पाणीसाठा कृष्णा लवादाच्या अटीप्रमाणे दिला पाहिजे, असे आमदार राजेश पाटील यांनी खासदार जगदीश शेट्टर यांना सांगितले. त्यावर निश्चितच आम्ही पाणी देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तिलारी जलाशयाच्या खालील बाजूला भांडुरा, देवल नाला, पाळेपुरमार अशी तीन जलाशये केली जाणार आहेत. त्या माध्यमातून मार्कंडेय नदीमध्ये पाणी सोडले जाणार आहे. महाराष्ट्रातील काही गावांबरोबरच बेळगाव तालुक्यातील विविध गावांना त्या पाण्याचा फायदा होणार आहे. याचबरोबर शहरालाही मोठा लाभ होणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. किटवडे जलाशय झाले तर गडहिंग्लज तालुका आणि कर्नाटकातील संकेश्वर तालुक्याला बारामाही पाणी मिळू शकते. याबाबत आराखड्यासह संपूर्ण माहिती खासदार जगदीश शेट्टर यांना देण्यात आली.

Advertisement

यावेळी माजी आमदार अनिल बेनके, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी या जलाशयांबाबतची माहिती खासदारांना दिली. हे प्रकल्प राबविल्यास संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तेव्हा लवकरात लवकर पाहणी करावी आणि निर्णय घ्यावा, अशी खासदारांना विनंती केली. त्यावर निश्चितच लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीला कोल्हापूर येथील पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता ए. एस. मेत्री, अविनाश फडतरे, स्वाती उरणकर, कर्नाटक पाटबंधारे खात्याचे सुशांत कुटबाळे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे नियोजन करण्यासाठी माजी उपमहापौर दीपक वाघेला, माजी नगरसेवक अनिल पाटील, पुंडलिक पावशे, अप्पा जाधव, किसन सुंठकर यांनी प्रयत्न केले. चंदगड येथून तानाजी गडकरी, एस. एल. पाटील यांसह आमदारांचे इतर कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.

शेतकरी महत्त्वाचा...

शेतकरी महाराष्ट्र किंवा कर्नाटकातला असो, तो महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचा विकास झाला तरच देशाची प्रगती होणार आहे. पण शेतकऱ्याला पाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी बैठक घेतली आहे. त्यानंतर आता खासदार जगदीश शेट्टर यांच्याबरोबर बैठक झाली असून लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावू व शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे आश्वासन आमदार राजेश पाटील यांनी दिले आहे.

Advertisement
Tags :

.