तिसऱ्या रेल्वेगेट ओव्हरब्रिजची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
बेळगाव : दर्जाहीन कामामुळे टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वेगेटजवळील ओव्हरब्रिज नेहमीच चर्चेत राहिला आहे. माध्यमांनी या उड्डाणपुलाच्या दैनावस्थेबद्दल आवाज उठवताच गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या उड्डाणपुलाला भेट देऊन पाहणी केली. गेल्या आठ दिवसांपूर्वी ‘तरुण भारत’ने शहरातील उड्डाणपुलांची दैनावस्था असे वृत्त प्रसिद्ध करून त्यावर प्रकाशझोत टाकला होता. बुधवारी सोशल मीडियावर आणि गुरुवारी वृत्तपत्रांमध्येसुद्धा या उड्डाणपुलाच्या दुरवस्थेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. याची नोंद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी उड्डाणपुलाची पाहणी केली. वास्तविक हा उड्डाणपूल अनेक रस्त्यांना जोडणारा असल्याने व येथून सातत्याने वर्दळ असल्याने महत्त्वाचा आहे. परंतु, त्याचे काम घाईघाईने पूर्ण करण्यात आले असून त्यातही दर्जा राखला गेला नाही. मुसळधार पावसामुळे पुलाचे काँक्रिटीकरण उखडले जाऊन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सायंकाळनंतर या ठिकाणी लहान-मोठे अपघात सातत्याने होत आहेत. याची नोंद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी स्वत: पाहणी केली व अधिकाऱ्यांना रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. 2022 मध्ये बांधण्यात आलेल्या पुलाची अवघ्या एक-दोन वर्षात झालेली दुरवस्था पाहता किती दर्जाहीन काम केले गेले, याचा अंदाज येत आहे.
केएलई इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कृतिशील पावले
दरम्यान, या उड्डाणपुलाच्या दुरवस्थेच्या केवळ बातम्या न पाहता किंवा त्यावर चर्चा न करता केएलई इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कृतिशील पावले उचलली. पुलावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडी आणि मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती करून दिलासा दिला. त्यांच्या या कृतीमुळे सध्या होत असलेले वाहनचालकांचे व पादचाऱ्यांचे त्रास काही प्रमाणात कमी झाले आहेत. प्रज्ज्वल पत्तार, वीरेंद्र पाटील, मयूर एस., व यश सौदागार या विद्यार्थ्यांनी केलेल्या कृतिशीलतेचे सर्वत्र स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.