खादरवाडी गावातील ‘त्या’ जमिनीची तहसीलदार-अधिकाऱ्यांकडून पाहणी
कागदपत्रांची तपासणी : ग्रामस्थांशी चर्चा : वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन
वार्ताहर /किणये
खादरवाडी गावातील बक्कापाची वारी येथील जमिनीसाठी ग्रामस्थ गेल्या अनेक महिन्यापासून मोर्चा-आंदोलन करत आहेत. त्यांनी पिरनवाडी नगरपंचायत, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच रेव्हन्यू डिपार्टमेंट यांना याबाबत माहिती दिलेली आहे. अखेर गावकऱ्यांच्या मागणीचा विचार करून शनिवारी सकाळी तहसीलदार तसेच खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या जमिनीची पाहणी केली. बक्कापाची वारी देवस्थानच्या ठिकाणी अधिकारी आले होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावातील काही नागरिकांनी या जमिनीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. ही आमच्या गावची मुख्य जमीन असून ही जमीनच हडप केल्यास गावातील जनावरांना चरण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही. या जमिनीच्या ठिकाणीच जिवंत पाण्याचा झरा आहे. त्या झऱ्याचे पाणी गावासाठी वापरण्यात येते. ही जमीन आम्हा गावकऱ्यांसाठी पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच जमिनीची सर्व कागदपत्रे आलेल्या अधिकाऱ्यांना दाखविण्यात आली. तहसीलदार सिद्धार्थ भोसरी, रेव्हन्यू खात्याचे अधिकारी पकाले, तलाठी हनुमंत मसादर आदींनी कागदपत्रांची तपासणी केली. तसेच या कागदपत्रासंदर्भात सविस्तर अभ्यास करून माहिती देऊ, असे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे सांगण्यात आले. यावेळी राकेश पाटील, राजेश पाटील, रमेश माळवी, परशराम भुजंग पाटील, प्रल्हाद कामतींसह गावकरी उपस्थित होते.