कौलापूरवाडा येथील पोल्ट्रीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
नियमाच्या चौकटीत कारवाई करण्याच्या सूचना : टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्याचे आश्वासन
खानापूर : तालुक्यातील कौलापूरवाडा येथील पोल्ट्री विरोधात कौलापूर ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी आंदोलन केले होते. तसेच पालकमंत्री सतिश जारकीहोळी खानापूर दौऱ्यावर आले असता पालकमंत्र्यांना भेटून पोल्ट्रीविरोधात निवेदन दिले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पोल्ट्रीची पाहणी करून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन कौलापूरवाडा येथे प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांची आणि पोल्ट्री व्यवस्थापकाशी चर्चा केली. तसेच अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत पोल्ट्रीवर कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या सूचना केल्या. कौलापूरवाडा गावालगत असलेल्या पोल्ट्रीविरुद्ध ग्रामस्थांनी पोल्ट्रीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून येथून पोल्ट्री तातडीने हटविण्यात यावी, अशी मागणी करून आंदोलन केले होते.
त्यांनी पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांना भेटून निवेदनही दिले होते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी कौलापूरवाडा येथील जिल्हा पशुसंगोपन, पर्यावरण आणि वैद्यकीय खात्याचे अधिकारी, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या समवेत पोल्ट्रीची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. आणि त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. यावेळी जिल्हाधिकारी मोहमद रोशन म्हणाले, 2021 नंतर पोल्ट्री व्यवसायाबाबत नवीन नियमावली लागू केली आहे. यापूर्वीचे वेगळे नियम असून या नियमाच्या चौकटीत जर कौलापूरवाडा येथील पोल्ट्री बसत असेल तर त्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. या नियमांचे पालन होत आहे की नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या. ग्रामस्थांनी पोल्ट्री अन्यत्र स्थलांतर करण्याची मागणी लावून धरली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने पोल्ट्रीचे स्थलांतर करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी खानापूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आय. आर. घाडी आणि कौलापूरवाडा येथील सखुबाई पाटील, अप्पू शिंदे, भैरु पाटील, वाघू पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते.