खासबाग आठवडी बाजाराची महापालिका आयुक्तांकडून पाहणी
भाजीविक्रेते-नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करणार
बेळगाव : गरिबांचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासबागच्या बाजाराला रविवारी महापालिका आयुक्तांनी भेट दिली. या परिसरात स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने भाजीविक्रेते तसेच ग्राहकांचीही गैरसोय होत आहे, ही बाब नगरसेवक रवी साळुंखे यांनी निदर्शनास आणून दिली. आयुक्तांनी स्वच्छतागृह बांधकामाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली. खासबाग, शहापूर येथील वॉर्ड क्र. 27 ची आयुक्त शुभा बी. यांनी पाहणी केली. आठवडी बाजार भरविला जातो, परंतु त्या मानाने नागरिकांना सुविधा दिल्या जात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. खासबाग बाजारात वडगाव, शहापूर, जुनेबेळगाव, खासबाग परिसरातील हजारो नागरिक खरेदीसाठी येतात. त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य निरीक्षकांतर्फे करण्यात आले आहे.
डॉ. आंबेडकर भवनाची डागडुजी
खासबागमध्ये असलेल्या डॉ. आंबेडकर भवनाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी स्लॅबला गळती लागली आहे. या भवनाची आयुक्तांनी पाहणी करून डागडुजी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच खासबाग परिसरात स्वच्छता करण्याचे आदेश देताच दुपारनंतर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. खासबाग बाजारपेठेत दिवसभरात लाखाहून अधिक नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यांच्यासाठी चार ठिकाणी मोबाईल टॉयलेट सुरू करण्याची सूचना करण्यात आली. यावेळी महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.