कारवार बोगद्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी
किमान 10 ठिकाणी पाणीगळती अन् दरडी शिथिलता : जिल्हा प्रशासनाकडून आश्वासनांची पूर्तता
कारवार :पुणे येथील सीओआयपी टेक्निकल युनिव्हर्सिटी भू-गर्भशास्त्र विभागाचे सहप्राध्यापक डॉ. एस. ए. मिश्रा आणि पथकाने रविवारी राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वरील येथून जवळच्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बोगद्यांची पाहणी केली. पाहणीच्यावेळी मिश्रा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बोगद्यातील किमान 10 ठिकाणी सुरू असलेल्या पाणीगळती आणि दरडी शिथिल झालेल्या स्थळांची पाहणी केली. बोगद्यांच्या सुरक्षितता संदर्भात करताना आमदार सतीश सैल, जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर, राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकारचे अधिकारी उपस्थित होते. कारवार आणि बिणगा दरम्यानचे हमरस्त्यावरील चार बोगदे 8 जुलैपासून सुरक्षिततेच्या कारणापोटी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. शेवटी एमएलएसी गणपती उळवेकर यांनी 29 सप्टेंबर रोजी छेडलेले आंदोलन आणि जनतेने केलेल्या मागणीपोटी जिल्हा प्रशासनाने या बोगद्यातील होणारी वाहतूक अटीवर लघु वाहनांसाठी खुली केली होती. 8 ऑक्टोबर रोजी बोगद्यांची पाहणी थर्ड पार्टीकडून करून अंतिम निर्णय घेण्यात येईल असे ठोस आश्वासन जिल्हाप्रशासनाने दिले होते. त्यानुसार रविवारी डॉ. मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाहणी केली.
काही अटीवर बोगद्यातील लघु वाहनांची वाहतूक सुरू
बोगद्यांच्या पाहणीनंतर बोलताना जिल्हाधिकारी मानकर म्हणाल्या, पावसाळ्यात बोगद्यामध्ये पाण्याची गळती सुरू झाली होती. बोगद्याच्या आजुबाजूची माती आणि दगड कोसळत होते. त्यामुळे बोगद्यातील वाहतूक असुरक्षित असल्याने 8 जुलैपासून बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळीच बोगद्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात थर्ड पार्टी पाहणीबाबत एनएचएआयला पत्र लिहिण्यात आले होते. जुलै 15 रोजी पुण्याचे तज्ञ डॉ. मिश्रा येथे दाखल होऊन बोगद्याचा आढावा घेताना अहवालासंदर्भात आम्ही संशय व्यक्त केला होता. तेव्हा जिल्हा प्रशासनाच्या किंवा एनएचएआयचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता आणि म्हणूनच पुन्हा एकदा थर्ड पार्टीने बोगद्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याची अट घालण्यात आली होती आणि बोगद्यातील लघु वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती.
गळती अन् अन्य समस्या मिश्रा यांच्या कानावर
यापूर्वीही आपण बोगद्याची पाहणी केली होती आणि त्यावेळी दिलेला अहवाल बरोबर होता, असेही रविवारी मिश्रा यांनी सांगितले. तरीसुद्धा गळतीच्या आणि अन्य काही समस्या मिश्रा यांच्या कानावर घालण्यात आल्या आहेत. मिश्रा यांनी काही सूचना दिल्या आहेत, असे पुढे जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी सांगितले.