कोलकाता प्रकरणात प्राचार्यांची चौकशी
कसून चौकशी, सीबीआयने केले पुरावे संकलित
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आता सीबीआय तपासाने वेग घेतला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे एक दल शनिवारी महाविद्यालयात पोहचले. या दलाने घटना घडली त्या स्थानात महत्वाचे पुरावे संकलित केले आहेत. या महाविद्यालयाच्या प्राचार्यांची तीन तास कसून चौकशी करण्यात आली. तसेच अन्य तिघांचीही चौकशी करण्यात आली. सीबीआयचे अधिकारी चौकशी पूर्ण होईपर्यंत कोलकाता येथेच तळ ठोकून राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
सीबीआय अधिकाऱ्यांनी शनिवारी या प्रकरणातील पिडितेच्या मातापित्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून काही माहिती घेतली. सीबीआयकडून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील सर्व घटनाक्रम समजून घेऊन त्यानंतर चौकशीच्या मुख्य भागाला प्रारंभ करण्याची सीबीआयची योजना असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
शवविच्छेदनाचा अहवाल
मृत महिला डॉक्टरच्या शवविच्छेदनाचा अहवाल तयार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. डीएनए चाचणी महत्वाची मानली गेली आहे. डीएनए चाचणीतून या दुष्कर्मात किती जण समाविष्ट होते, याची माहिती मिळण्याची शक्यता आहे. शवविच्छेदनाचा अहवाल सादर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने चौकशीची दिशा निर्धारित होईल, अशी असे तज्ञांचे मत आहे.
पिडिता दबावाखाली ?
या प्रकरणातील पिडिता डॉक्टरवर सातत्याने महाविद्यालयात दबाव टाकला जात होता, अशी माहिती तिच्या मातापित्यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना दिली. सीबीआयने नेमका कोणता दबाव होता आणि तो कोणाकडून आणण्यात आला होता, याची चौकशी आता चालविली आहे. याच संबंधात संदीप घोष यांना प्रश्न विचारण्यात आले होते. ज्या स्थानी दुष्कर्म घडले, त्या स्थानाची दुरुस्ती त्वरीत हाती का घेण्यात आली ? असा प्रश्नही सीबीआयने विचारला आहे.