कोचिंग सेंटर विद्यार्थी मृत्यूप्रकरणी गृह मंत्रालयाकडून चौकशी समिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील राजेंद्रनगर येथील कोचिंग सेंटरमध्ये तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. 27 जुलै रोजी राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. घटनेच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी राव आयएएस कोचिंग सेंटरबाहेर निदर्शने केली. तसेच राजकीय पातळीवरही या घटनेचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेत समिती स्थापन केली आहे. दरम्यान, संपूर्ण दिल्लीसह देशातही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणात प्रशासनासह तपास यंत्रणांकडूनही कारवाईला वेग आला आहे. दिल्लीच्या नायब राज्यपालांनीही सोमवारी घटनास्थळाला भेट देत संबंधितांशी संवाद साधला. तपासात सुरू असलेल्या सुधारणांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या वारसांना त्यांनी प्रत्येकी 10 लाख रुपये भरपाई देण्याची माहितीही दिली.