महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आतला आवाज

06:22 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्रह्मदेवाने जेव्हा ही अद्भुत सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याने प्रत्येक जिवाला व्यक्त होण्यासाठी स्वत:चा वेगळा असा आवाज दिला. ध्वनी, नाद हे जीवसृष्टीचे प्रधान वैशिष्ट्या आहे. ध्वनी ही एक ताकदही आहे. दृष्टीस न पडणाऱ्या सूक्ष्म जिवालाही आवाज आहे. मानवाच्या कानाला मर्यादा असल्यामुळे त्याला तो जाणवत नाही. छोट्या मुंगीलाही आवाज आहे. जंगलामधल्या मानवविरहित एकांतात तो ऐकता येतो. पशुपक्षी यांच्यासह झाडांमध्ये देखील आनंदध्वनी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे.

Advertisement

मानवी शरीरामधील सरस्वतीनामक नाडी नाभीतून निघते व जिभेच्या अग्रभागापर्यंत येते. ती नाडी ध्वनी प्रकट करते. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाचा असून वैखरी वाणीच्या साह्याने आवाज प्रकट होतो. वैखरी वाणी कंठाशिवाय वाणी निर्माण करू शकत नाही. श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये रामकृपेचे कवच आहे. श्रीरामांनी शरीर-मनाचे रक्षण करावे अशी प्रार्थना आहे. ‘शिरो मे राघव: पातु’ पासून हे कवच सुरू होते. त्यात ‘कंठं भरतवंदित?’ असे म्हटले आहे. पवित्र मंत्रोच्चार करणारा, श्रीरामांना पूजणारा असा भरत. ‘सतत वंदनभक्ती केलेला राम माझ्या कंठाचे रक्षण करो’ अशी ही प्रार्थना आहे. डॉ. रघुनाथ शंकर घाटे श्रीरामरक्षा रहस्य उलगडून सांगताना म्हणतात, ‘रामावर नितांत प्रेम करणाऱ्या भरताला जेव्हा माता कैकयीने रामाला वनवासात पाठवले हे कळले तेव्हा क्रोधाने त्याने आपल्या मातेची कठोर शब्दात निर्भर्त्सना केली. त्यामुळे भरताचे स्वरयंत्र पूर्णपणे बिघडले. कंठामध्ये असलेले विशुद्ध चक्र दूषित झाले. श्रीराम प्रभूंनी भरताला गळामिठी मारून त्याचे अंत:करण तर शांत केलेच शिवाय विशुद्ध चक्रही जागृत केले. दुसऱ्याचे अंत:करण दुखावेल असे शब्द उच्चारून माझे स्वरयंत्र बिघडू देऊ नका. श्रीरामा, आपल्या कृपादृष्टीने विशुद्ध चक्र जागृत करा, कंठाचे रक्षण करा अशी श्री रामरक्षा कवचामध्ये प्रार्थना आहे. वैखरी वाणी नाद निर्माण करते. मात्र शब्दांना आकार प्राप्त होतो तो कंठामुळेच. भगवान शिवशंकराने राम हे नाम कंठात धारण केले. संत कान्होपात्रा ही गणिकेची मुलगी होती. सुंदर, देखणी होती. तिच्या आईला वाटायचे की आपल्या मुलीने कंठामध्ये कलाकुसर असलेले विविध प्रकारचे दागिने घालावेत. परंतु तिचा गळा विठ्ठलनामासाठी तळमळत होता. संत कान्होपात्रा म्हणते, ‘ज्याचे घेता मुखी नाम । धाकी पडे काळ यम । अशी नामाची थोरी ।  उद्धरिले दुराचारी ।  नष्ट गणिका अजामेळ ।  वाल्मिकी झाला तो सोज्वळ। ऐशी नाममाळा । कान्होपात्रा ल्याली गळा ?’ कान्होपात्रेने चिरंजीव, अक्षय अशी विठ्ठलनामाची माळ गळ्यात धारण केली.

Advertisement

वाचा प्रकट व्हायला सूर्यबळ लागते. ढगाळ वातावरणात, अतिशय थंडीमध्ये घसा बसतो. महामुनी याज्ञवल्क्य ऋषी सूर्यकवच या स्तोत्रात म्हणतात, ‘जिव्हां मे मानद: पातु कंठं मे सुरवंदित?’ मृत्युसमयी अग्नी म्हणजे सूर्यशक्ती असेल तरच भगवंताचे नाव कंठातून मुखात येते. अन्यथा शब्द कंठातच अडकतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘आता असो हे सकळ । जाण पा ज्ञानासी अग्नी मूळ । तया अग्नीचे प्रयाणी बळ । संपूर्ण आधी?’  ज्ञानाला अग्नी हा मूळ कारण आहे. म्हणून प्रयाणकाळी अग्नीचे बळ पाहिजे.

आवाज ही ईश्वरी देणगी आहे. ओशो रजनीश म्हणतात, ‘पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटावर ध्यान लावावे. तिथे चित्त एकाग्र होते. तो परमात्म्याचा आवाज आहे.’ अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी वाघाबद्दलचे एक निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, ‘घनदाट अरण्यातील अस्पर्शित दऱ्याखोऱ्यांतून ब्राह्म मुहूर्तावर चराचर सृष्टीवर प्रभाव टाकणाऱ्या वाघाचा आगळावेगळा ध्वनी ऐकू येतो. वाघ खाली मान घालून दीर्घ श्वास घेतो. नंतर त्याचा नि:श्वास जबड्यातील टाळूवरून परावर्तित होतो. वाघाच्या या स्वराची इतर प्राणिमात्राला भीती वाटत नाही. हा स्वर वाघाच्या नाभीतून कंठात येतो अन् कंठातून अंतरिक्षात विलीन होतो.’ सुरांची जादू प्रदान करणाऱ्या परमेश्वराचे ऋण कसे फेडणार?

आवाज निर्माण करणाऱ्या, स्वरसिद्धी देणाऱ्या त्या प्रत्यक्ष परमात्म्याचा आवाज कसा असेल बरे?  शास्त्रज्ञ असे म्हणतात की, उच्चारलेला प्रत्येक शब्द अवकाशात जातो तेव्हा तो विरून जात नाही. नष्टही होत नाही. शब्दांच्या ध्वनीला असलेली स्पंदने कधीही नष्ट होत नाहीत. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या गीतेच्या श्लोकांचा अवकाशात अंतर्धान पावलेला ध्वनी अवकाशातून काढून ध्वनिमुद्रित करण्यात शास्त्रज्ञ काही प्रमाणात यशस्वी झाले, असे शास्त्रज्ञ डॉ. र. न. शुक्ल म्हणतात.

सर्वाघटी परमेश्वर या नात्याने परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. प. प.  वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज मानवी शरीरातील हृदयस्थ परमेश्वराला कुटस्थ म्हणतात. स्वामींनी नवरत्नमाला हे स्तोत्र लिहिले आहे. त्यात पंचकोशाचे विवरण आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या कोशांच्या आत आत्मतत्त्व आहे. त्याला स्वामी महाराज कुटस्थ म्हणतात. या कुटस्थापर्यंत पोहचणे अजिबात सोपे नाही. त्याला ओळखणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होणे.

या कुटस्थाच्या, अर्थात चैतन्याच्या अस्तित्वामुळेच, उर्जेमुळेच मानवी देहाचे सारे व्यापार चालतात. स्वामी म्हणतात, ‘माझे स्वरूप अजय अक्रिय मी अनंत, कुटस्थ मी तरी सदोदित साक्षीभूत’.  देह पडला तरी नाश न होणारा चिन्मय परमात्मा साक्षीभूत, निर्गुण, निराकार आहे. परंतु त्याच्यामुळे माणसाचा आतला आवाज जागृत आहे. या आवाजाला ध्वनी नाही. स्पंदने नाहीत. मात्र जाणीव आहे. आतला आवाज सत्यापासून कधीच दूर जात नाही. तो माणसाला वेळोवेळी जागृत करतो. आत्मभान जागे करणारे अनेक प्रसंग माणसाच्या आयुष्यात येतात आणि निघून जातात. कोणीतरी एखादा सद्गुरूकृपांकित साधक मायेचे पांघरूण बाजूला सारून जागा होतो आणि आतल्या आवाजाच्या मार्गदर्शनाने स्वत:चा उद्धार करून घेतो.

आतला आवाज ऐकून आचरणात आणायला सद्गुरूकृपाच हवी, हे निश्चित. पुराणांमध्ये आकाशवाणीचे संदर्भ येतात. ही आकाशवाणी म्हणजे आतला आवाजच आहे. मीपण बाजूला झाले की मनावर परमात्म्याचे अधिराज्य चालते आणि आकाशवाणी जाणिवेत येते. समजते. ही आकाशवाणी अंतर्मुखतेमुळेच कळते. म्हणूनच ती प्रत्येकाला ऐकू येत नाही. ही आकाशवाणी नामस्मरणाने सुरू होते आणि ऐकू येते. म्हणून सद्गुरूंनी दिलेले नाम घेण्याशिवाय पर्याय नाही.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article