जडेजा, राहुलच्या दुखापतीमुळे भारताच्या डोकेदुखीत वाढ
रजत पाटीदारसह सर्फराज खान वा वॉशिंग्टन सुंदरची वर्णी लागण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रवींद्र जडेजा आणि के. एल. राहुल यांना अवेळी झालेल्या दुखापतीमुळे भारतासाठी संघ निवड प्रक्रिया डोकेदुखी बनली आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत भारताला पुनरागमन करायचे आहे. जडेजा आणि राहुल या दोघांचाही हैदराबादमधील कसोटीच्या पहिल्या डावात भारतातर्फे महत्त्वाची कामगिरी केलेल्या खेळाडूंमध्ये समावेश होतो. पण त्यानंतर इंग्लंडने बलाढ्या यजमानांवर मात केली.
हैदराबाद कसोटीत झटपट एकेरी धाव काढण्याच्या भरात जडेजाच्या धोंडशिरेला दुखापत झाली होती, तर राहुलने उजव्या मांडीत वेदना होत असल्याची तक्रार केली आहे. आधीच भारताला इंग्लंडच्या ‘बाझबॉल’ रणनीतीने धक्का दिलेला असून या दोघांच्या अनुपलब्धतेमुळे यजमानांसमोरच्या समस्यांत भर पडली आहे.
जडेजाच्या अष्टपैलू क्षमतेमुळे त्याची उणीव भरून काढणे कठीण आहे आणि राहुल देखील सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रियेतून सावरून परत आल्यापासून एकदिवसीय आणि कसोटींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या भारताच्या फलंदाजांपैकी एक राहिलेला आहे. विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे अनुपलब्ध आहे आणि मालिकेच्या सलामीच्या सामन्यात धक्कादायक रीतीने पराभूत झाल्यानंतर शुक्रवारपासून विशाखापट्टणममध्ये सुरू होणाऱ्या दुसरी कसोटीत संघ व्यवस्थापनाला त्याची उणीव जास्तच भासणार आहे.
सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन खेळाडूंचा निवड समितीने संघात समावेश केलेला असल्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यापुढे निवडीसाठी पुरेसे पर्याय आहेत. एकंदर परिस्थिती पाहता मुख्य संघात रजत पाटीदारची निवड होऊ शकते. हैदराबादमधील कसोटीसाठीच्या 15 खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होता. पाटीदार राहुलची जागा घेऊ शकतो. दुसरीकडे, आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यासोबत तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवची वर्णी लागू शकते.
भारतासाठी आणखी एक पर्याय म्हणजे इंग्लंडने सलामीच्या सामन्यात जसे केले त्याप्रमाणे चार फिरकी गोलंदाज खेळविण्यासाठी एकच वेगवान गोलंदाज खेळवणे. अशावेळी मोहम्मद सिराजला कुलदीपसाठी संघाबाहेर ठेवले जाऊ शकते तसेच मधल्या फळीला मजबूत करण्यासाठी सर्फराज खान किंवा वॉशिंग्टन सुंदर यापैकी एकाला सामावून घेतले जाऊ शकते. सौरभ हा जडेजासारखा डावखुरा फिरकी गोलंदाजी करतो आणि त्याच्या नावावर दोन प्रथम श्रेणी शतकांसह फलंदाज म्हणून चांगली कामगिरी आहे. तो या शर्यतीत बाजी मारू शकतो.
विशाखापट्टणममधील ‘एसीए-व्हीडीसीए’ स्टेडियमवर आजपर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि तेथील खेळपट्टी सर्वसामान्यपणे पहिल्या डावात फलंदाजीसाठी अनुकूल असते. 2019 मध्ये याच मैदानावर प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेविऊद्ध पहिल्या डावात 502 धावा केल्या होत्या, ज्यात मयंक अग्रवालने द्विशतक केले होते आणि रोहितने कसोटी सलामीवीर म्हणून पहिल्या डावात 176 धावा केल्या होत्या.
दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या मते, संघातील फिरकीपटू कुलदीपची उपस्थिती उपयुक्त ठरेल. ‘जर भारताला वाटत असेल की, त्यांना फक्त एक वेगवान गोलंदाज पुरेसा आहे, तर कुलदीपचे संघात असणे नक्कीच मदत करेल. त्याच्याकडे विविधता असेल. पण इंग्लंड येथे येईल आणि हैदराबादमध्ये जे केले तेच करेल, असे कुंबळेने म्हटले आहे.
चार कसोटींत भरपूर आश्वासक कामगिरी करून दाखविल्याने डावखुरा फलंदाज वॉशिंग्टनचे पारडे देखील निवडीच्या दृष्टीने भारी ठरू शकते. तो उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजीही करू शकतो. गब्बा येथील ऐतिहासिक कसोटी विजयाचा भाग बनून पदार्पण केल्यानंतर त्याला 2021 मधील इंग्लंडविऊद्धच्या मायदेशातील मालिकेतील तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी लाभली होती. वॉशिंग्टनने त्या मालिकेतील पाच डावांत नाबाद 85 आणि नाबाद 96 अशा खेळी केल्या होत्या आणि अश्विन व अक्षर या आघाडीच्या फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजविलेल्या त्या मालिकेत दोन बळी टिपले होते.