For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जखमी पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

06:45 AM Jan 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
जखमी पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कर्णधार
Advertisement

 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी कांगारुकडून तगड्या संघाची घोषणा : मॅथ्यू शॉर्ट, अॅरॉन हार्डी नवे चेहरे  

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

सर्वांना उत्सुकता असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा येत्या 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत खेळवली जाणार आहे. अशातच याच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघाने टीमची घोषणा केली. दुखापतीमुळे कमिन्स या मालिकेला मुकणार अशी चर्चा होती, पण चॅम्पियन्स ट्रॉफीत तो ऑस्ट्रेलियाच नेतृत्व करणार आहे. सोमवारी जाहीर केलेल्या संघात दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडलाचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, मॅथ्यू शॉर्ट, अॅरॉन हार्डी या दोन नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

Advertisement

पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या स्पर्धेत संघात समतोल राहावा यासाठी सर्व बाबी लक्षात घेऊन संघाची निवड करण्यात आली असल्याचे ऑस्ट्रेलियन निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी सांगितले. अष्टपैलू नॅथन एलिसचा संघात समावेश करण्यात आला आहे. मॅथ्यू शॉर्ट, अॅरॉन हार्डी आणि एलिस या त्रिकुटाने डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन आणि सीन अॅबॉट यांची जागा 14 महिन्यांपूर्वी एकदिवसीय विश्वचषक जिंकलेल्या संघातून घेतली आहे. वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे ग्रीन स्पर्धेबाहेर आहे.

कमिन्सकडे धुरा, हेजलवूडलाही स्थान

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान पॅट कमिन्सच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच त्याने आगामी श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतली आहे. तसेच डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होणार की नाही याबाबत सांशकता होती. मात्र सोमवारी निवड समितीने कमिन्सकडे नेतृत्वाची जबाबदारी देत संघाची घोषणा केली आहे. याशिवाय, भारताविरुद्ध कसोटी मालिकेत जखमी झालेल्या वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

अनेक तगड्या खेळाडूंना स्थान

ऑस्ट्रेलियन संघाने दोनवेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. अशातच यंदाही वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांनी ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल असे तगडे खेळाडू ऑस्ट्रेलियाने निवडले असून टीम इंडियासाठी विशेषत: धोक्याची घंटा आहे. तसेच मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस यांना देखील संघात स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, आठ देशांच्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार म्हणून उतरणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसह ब गटात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 22 फेब्रुवारीला पहिला सामना इंग्लंडशी खेळणार आहे. यानंतर 25 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेशी आणि 28 तारखेला अफगाणिस्तानशी त्यांचा सामना होईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, अॅरॉन हार्डी, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, अॅडम झम्पा.

टेंबा बवुमाकडे आफ्रिकेची कमान

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला आहे. टेंबा बवुमाकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. बवुमाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. गेल्या टी20 विश्वचषकात आफ्रिकन संघाने फायनलपर्यंत धडक मारली होती. आता ते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज आहेत. आफ्रिकेने संघात तीन घातक गोलंदाजांना स्थान दिले आहे. लुंगी एनगिडी आणि अॅनरिक नॉर्किया टीममध्ये परतले आहेत. केशव महाराज, तबरेज शम्सी, रायन रिकेल्टन आणि कागिसो रबाडा हे देखील संघाचा भाग आहेत. रबाडा हा संघाचा सर्वात घातक गोलंदाज आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी द.आफ्रिकेचा संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्जी, मार्को यान्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्किया, कागिसो रबाडा, रियान रिकेल्टन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर डुसेन.

हशमतुल्लाह शाहिदी अफगाणचा कॅप्टन

काबूल : आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला संघ घोषित केला आहे. अफगाणिस्तानने रविवारी (12 जानेवारी) संध्याकाळी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. त्यामध्ये राशीद खान आणि इब्राहिम झादरान यांच्यासमवेत रहमानुल्लाह गुरबाज यांनाही संधी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानने हशमातुल्लाह शाहिदीवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. यासह, संघात 3 राखीव खेळाडूंना देखील स्थान देण्यात आले आहे.

अफगाणचा संघ - हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रन, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रेहमत शाह, इक्रम अलीखिल, गुलबदिन नईब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, गझनफर, नूर अहमद, फजलहक फारूकी, फरीद मलिक, नावेद झद्रन.

Advertisement
Tags :

.