चौताला परिवाराला एकजूट करण्यासाठी पुढाकार
राकेश टिकैत सरसावले : अभय, अजय चौतालांना आवाहन
वृत्तसंस्था/ सिरसा
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी चौताला परिवाराला एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. ओमप्रकाश चौताला यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताकरता निर्णय घेतले होते, असे म्हणत टिकैत यांनी शेतकऱ्यांची शक्ती आणि त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी एकजूट होण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. हरियाणाच्या राजकारणात शक्तिशाली राहिलेल्या चौताला परिवारात आता फूट दिसून येत आहे. चौताला परिवाराचे सदस्य सध्या वेगवेगळ्या पक्षात सक्रीय आहेत.
चौताला परिवाराचा व आमचा पाच पिढ्यांपासून संबंध राहिला आहे. देवीलाल यांच्यापासून सध्याच्या पिढीपर्यंतच राजकारण आम्ही पाहिले आहे. ओमप्रकाश चौताला हे नेहमीच जनसेवा आणि ग्रामीण क्षेत्रांशी जोडलेले राहिले. ते कधीही चंदीगडला जाण्याऐवजी गावांमधून जाणे पसंत करायचे. तळागाळाशी जोडलेले राजकारण आणि शेतकरी हितांबद्दलचे त्यांचे समर्पण सर्वांनाच माहित आहे. ओमप्रकाश चौताला यांच्या धोरणांने नेहमीच शेतकरी आणि ग्रामीण समुदायाच्या कल्याणाचे काम केल्याचा दावा टिकैत यांनी केला आहे.
टिकैत हे सिरसा येथील चौताला गावात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी पोहोचले होते. शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या आमरण उपोषणावरही त्यांनी भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील डल्लेवाल यांच्या उपोषणावर चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकार पंजाब सरकारला बदनाम करू पाहत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रकरणी मध्यस्थी करावी, तरच याप्रकरणी तोडगा निघू शकतो. परंतु केंद्र सरकारचा हेतू चांगला नसल्याचा दावा टिकैत यांनी केला आहे.