लाळ्या प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ
घरोघरी मोहीम : 13 लाख जनावरांना लस देण्याचे उद्दिष्ट
बेळगाव : लाळ्या खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. पशुसंगोपन खात्याच्या आवारात उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते या मोहिमेला चालना देण्यात आली आहे. जिल्ह्यात 13 लाख जनावरांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लसीकरणाचा पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. घरोघरी जाऊन जनावरांना मोफत लस टोचली जाणार आहे. जिल्ह्यात 28 लाख जनावरे आहेत. त्यापैकी गाय, म्हैस, बैल आणि त्यांच्या वासरांना लस टोचली जाणार आहे. एकही जनावर यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. अलीकडे जनावरांना लम्पी, लाळ्या आणि इतर रोगांची लागण होऊ लागली आहे. याची खबरदारी म्हणून वेळोवेळी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लसीकरणाबाबतच्या सर्व सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शिवाय जिल्ह्यात 400 हून अधिक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून घरोघरी पोहोचून लसीकरण करण्यात येणार आहे.
निरोगी ठेवण्यासाठी लसीकरणाची गरज
लाळ्या रोगाची लागण झाल्यास दूधक्षमतेवर परिणाम होऊन आर्थिक फटका बसतो. जनावर निरोगी ठेवण्यासाठी पशुपालकांनी सर्व जनावरांना प्रतिबंधक लस द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.