बसवण कुडची येथील यात्रेत इंगळ्या कार्यक्रम उत्साहात
वार्ताहर /सांबरा
बसवण कुडची येथील ग्रामदैवत बसवेश्वर, कलमेश्वर व ब्रह्मदेवाची यात्रा सुरू असून मंगळवारी यात्रेच्या मुख्य दिवशी ‘हर हर महादेव’च्या गजरात इंगळ्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरम्यान, हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता. सकाळी मंदिरात धार्मिक विधी व पूजा पार पडली. सकाळपासूनच श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळनंतर गर्दीमध्ये प्रचंड वाढ झाली. सायंकाळी 5 वाजता इंगळ्यांच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी चव्हाट गल्ली बेळगाव येथून व गावातील बस्ती गल्ली व बसवाण गल्ली येथून पालख्या मंदिरासमोर दाखल झाल्या. यावेळी देवस्थान व पंच कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधीवत पूजा झाल्यानंतर इंगळ्यांच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्षण पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मंदिर परिसरात अनेक स्टॉल्सवर भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. बुधवार दि. 3 व गुरुवार दि. 4 रोजी गावात खळ्याच्या कुस्त्यांचे आयोजन केले आहे. मंगळवार दि. 9 रोजी गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात अभिषेक घालण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 5 वाजता पंचांग पठण व त्यानंतर बालशिवाजी लाठी मेळ्यातर्फे प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील. रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होईल.