इन्फोसिसचा नफा 8 टक्क्यांनी वाढला
वाढीसह नफा कमाई 6,921 कोटीवर : महसूल 42,279 कोटी रुपयांवर
वृत्तसंस्था/मुंबई
जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी सेवा देणारी कंपनी इन्फोसिसने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 6,921 कोटी रुपयांचा नफा (एकत्रित निव्वळ नफा) नोंदवला आहे. ही वार्षिक आधारावर 8.7 टक्के वाढ आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 6,368 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. दुसरीकडे महसुलाचा विचार करता एप्रिल-जून तिमाहीत कंपनीने 42,279 कोटी रुपयांचा महसूल कमावल्याचे पाहायला मिळाले. वार्षिक आधारावर त्यात 7.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी म्हणजेच आर्थिक वर्ष 24-25 च्या पहिल्या तिमाहीत, टेक कंपनीने 39,315 कोटी रुपये महसूल मिळवला होता.
जून 2025 पर्यंत एकूण 3,23,788 कर्मचारी
इन्फोसिसने अहवाल दिला आहे की, कंपनीचा स्वेच्छेने नोकरी सोडण्याचा दर एप्रिल-जून तिमाहीत वाढून 14.4 टक्के झाला आहे, जो मागील तिमाहीत म्हणजेच जानेवारी-मार्च 2025 मध्ये 14.1 टक्के आणि गेल्या वर्षी एप्रिल-जून 2024 मध्ये 12.7 टक्के होता. गेल्या बारा महिन्यांच्या आधारे, मागील वर्षाच्या तुलनेत कंपनी सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ दिसून येते. 30 जून 2025 रोजी, बंगळुरूस्थित कंपनीत एकूण 3,23,788 कर्मचारी होते, तर मार्च 2025 अखेर ही संख्या 3,23,578 होती. ही तिमाहीत एकूण 210 कर्मचाऱ्यांची वाढ दर्शवते.
शेअर्स 6 महिन्यात 16 टक्क्यांनी घसरले
तिमाही निकालांपूर्वी बुधवारी इन्फोसिसचे शेअर्स 0.76 टक्क्यांनी घसरून 1,558.90 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 2 टक्क्यांनी घसरला. तर 6 महिन्यांत तो 16 टक्के आहे आणि या वर्षी म्हणजे 1 जानेवारीपासून आजपर्यंत 17 टक्के आहे. त्याच वेळी, एका वर्षात कंपनीचा शेअर 15 टक्क्यांनी घसरला. कंपनीचे बाजारमूल्य 6.52 लाख कोटी रुपये आहे.