ट्रुडोंच्या सल्लागाराकडून माहिती लीक
अमेरिकेच्या वृत्तपत्राला भारताविषयी गोपनीय माहिती पुरविली
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि उपविदेशमंत्र्यांनी अमेरिकेचे वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टला भारताविषयी संवेदनशील गोपनीय माहिती पुरविली होती. कॅनडाच्या पोलिसांकडून जाहीरपणे भारतावर आरोप करण्यापूर्वीच ही माहिती लीक करण्यात आली होती. त्यानंतरच कॅनडाच्या पोलिसांनी भारत सरकारच्या कथित हस्तकांवर कॅनडात हत्या, खंडणीवसुली आणि हिंसक गुन्हेगारी कारवाया करण्याचा आरोप केला होता.
ट्रुडो यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गुप्तचर सल्लागार नथाली ड्रौइन आणि उपविदेशमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी वॉशिंग्टन पोस्टला कॅनडातील भारताच्या कथित हस्तक्षेपाविषयी माहिती दिली होती. कॅनडातील पोलीस आयुक्त माइक ड्यूहेम यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी ही माहिती लीक करण्यात आली होती. वॉशिंग्टन पोस्टने त्याच दिवशी कॅनडाच्या अधिकाऱ्यांचा दाखला देत सुखदूल सिंह गिलच्या हत्येशी भारताला जोडले होते. सुखदूल सिंह यांची 20 सप्टेंबर 2023 रोजी विन्निपेगमध्ये हत्या करण्यात आली होती.
भारतीय अधिकारी हिंसक कारवायांमध्ये सामील असल्याचे स्पष्ट पुरावे असल्याचा दावा पोलीस आयुक्त ड्यूहेम आणि सहाय्यक आयुक्त ब्रिगिट गौविन यांनी 14 ऑक्टोबर रोजी केला होता. परंतु तपास आणि न्यायालयीन कार्यवाहीचा दाखला देत याचा तपशील देणे टाळले होते. विन्निपेगमध्ये गिल यांच्या हत्येशी भारताचा संबंध असल्याचे आयुक्त ड्यूहेम यांनी मान्य केले नव्हते.
भारत अन् कॅनडामध्ये तणाव
कॅनडाकडून कुठल्याही ठोस पुराव्यांशिवाय आरोप करण्यात येत असल्याचे भारताने म्हटले आहे. कॅनडा सरकार, विशेषकरून पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे राजकीय लाभासाठी भारताला बदनाम करत असल्याचे भारत सरकारने सुनावले आहे. तर कॅनडा सरकारकडून आरोप करण्यात आल्यावर भारताने उच्चायुक्त संजय कुमार वर्मा समवेत 6 राजनयिकांना माघारी बोलाविले आहे. तसेच कॅनडाच्या 6 राजनयिकांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे.