कर्नाटक सरकारच्या दडपशाहीची उद्धव ठाकरे यांना दिली माहिती
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या दडपशाहीची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आली. महामेळाव्याला परवानगी नाकारत म. ए. समिती कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटक सरकारच्या दंडुकेशाहीविरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडे न्यायाची मागणी करण्यात आली. आपले बेळगाववर लक्ष असून आपण सदैव सीमावासियांसोबत आहोत, असे आश्वासन ठाकरे यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा घेण्यासाठी पोलिसांकडे रितसर परवानगी अर्ज दिला होता. आदल्या दिवशीपर्यंत प्रशासनाकडून महामेळाव्याला तोंडी परवानगी देण्यात आली. परंतु सोमवारी सकाळी परवानगी नाकारली असल्याचे सांगून महामेळावा होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले.
खानापूर, तसेच बेळगावमधील पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक सीमावासियाला पोलिसांनी अमानुष्य वागणूक दिली. याची माहिती युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. केवळ बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून विधिमंडळ अधिवेशन भरविले जात आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा निकाल प्रलंबित असताना दुसरीकडे कन्नडसक्ती दिवसेंदिवस तीव्र केली जात आहे. मराठी व्यापाऱ्यांना व्यापार करणेही अवघड होत असल्याने आपण सीमालढ्याला बळ द्यावे, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शिवसेनेच्या युवा सैनिकांनी मंगळवारी मुंबई येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सोमवारी बेळगावमध्ये झालेल्या घटनेची सर्व माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, वैभव कामत, मल्हारी पावशे, अद्ववेद माने, जय पावशे, सक्षम कंग्राळकर, विनायक पाटील यांसह इतर सदस्य उपस्थित होते.