रोहयोअंतर्गत विकासकामांचे माहिती संकलन अभियान सुरू
अभियानांतर्गत जागृती कार्यक्रम राबविणार
खानापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 2025-26 या वर्षासाठी रोजगार निर्मितीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम शासनाकडून हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक गावाना आवश्यक असलेल्या कामाबाबत माहिती संकलन करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले असून या अभियानाच्या वाहनाला तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात मनरेगाच्या तालुका संचालक रुपाली बडकुंद्री यांनी हिरवा झेंडा दाखवून चालना दिली. यावेळी गंगा पडगुग्गरी, विश्वनाथ हट्टीहोळी, महांतेश जंगटी, शशीधर सत्तीगेरी, रविंद्र तेलसंग, बसवराज बदनीकाई, अक्षय चव्हाण, श्रीशैल्य पाय्यटी यासह इतर अधिकारी उपस्थित होते. हे वाहन पुढील महिनाभर प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देऊन आवश्यक असलेल्या कामांची माहिती संकलन करणार आहे.
गावोगावी जाऊन विकासकामाची माहिती संकलन करणार
या अभियानांतर्गत मनरेगाचे अधिकारी प्रत्येक गावोगावी जावून आवश्यक असलेल्या विकासकामाची माहिती संकलन करणार आहेत. यासाठी गाव बैठक महिला संघाच्या बैठका, रोजगार कामगारांच्या बैठका घेऊन प्रत्येक गावासाठी रोजगार हमी योजनेतून आवश्यक असलेल्या कामाची माहिती संकलन करणार आहे. यानंतर याबाबतचा अहवाल तयार करुन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. पुढील एप्रिलपासून या कामाची सुरवात करण्यात येणार आहे. यासाठी सरकाकडून आवश्यक असलेल्या कामांची माहितीही राज्य सरकारच्या मनरेगा खात्याच्या वेबसाईटवरही आपल्या कामाची मागणी करू शकता. यासाठी http://mgnrega.karanataka. gov.in या वेबसाईटवर कामाची माहिती द्यावी, यासाठी 5 नोव्हेंबर अंतिम तारीख ग्रा. पं. च्या क्षेत्रातील रोजगार कामगार आणि सदस्यांनी आवश्यक असलेल्या कामाची माहिती या वेबसाईटवर दाखल करावी, असे आवाहन मनरेगा अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.