बेळगाव वन केंद्रात माहिती फलक केवळ कन्नड भाषेतच
तिन्ही भाषांतील फलक बसविण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : रिसालदार गल्लीतील तहसीलदार कार्यालयात असलेल्या बेळगाव वन केंद्रातून देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र सदर फलक केवळ कन्नड भाषेतीलच असल्याने इतर भाषिकांना सदर फलकांवरील माहिती समजणे कठीण झाले आहे. त्यामुळे सर्व भाषिकांना माहिती कळावी यासाठी तिन्ही भाषांतील फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. बेळगावात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. मात्र बेळगाववर कर्नाटक सरकारकडून जबरदस्तीने कन्नड भाषा लादली जात आहे. विविध सरकारी कार्यालयांमध्ये कानडीकरणाचा वरवंटा फिरविला जात आहे. मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेतून सरकारी परिपत्रके द्यावीत, असा आदेश यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिला आहे.
त्याचबरोबर केंद्रीय अल्पसंख्याक आयोगानेही तसा आदेश जिल्हा प्रशासनाला दिला आहे. पण या आदेशांची अंमलबजावणी करण्याऐवजी पायमल्ली केली जात आहे. विविध कामानिमित्त सरकारी कार्यालयांमध्ये जाणाऱ्या नागरिकांना त्यांच्या भाषेत फलक किंवा माहिती देण्यात येत नसल्याने गोची होत आहे. केवळ कन्नड भाषेतून माहिती फलक लावले जात आहेत. शहरातील चार बेळगाव वन केंद्रांमध्ये नागरिकांना विविध प्रकारची सेवा दिली जाते. मात्र अलीकडेच रिसालदार गल्लीतील बेळगाव वन केंद्रात लावण्यात आलेले फलक केवळ कन्नड भाषेतील आहेत. कन्नड भाषा न येणाऱ्यांना सदर माहिती समजणे कठीण जात आहे. त्यामुळे सर्वांना फलकांवरील माहिती समजावी, यासाठी तिन्ही भाषांतील फलक लावण्यात यावेत, जेणेकरून सर्वसामान्यांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी केली जात आहे.