महागाई दर 3.2 टक्के राहील : क्रिसील
आर्थिक वर्ष 2025-26 करीता अंदाज : रेपो दरात कपात शक्य
वृत्तसंस्था/ मुंबई
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये किरकोळ महागाई दर हा 3.2 टक्के इतका राहू शकतो, असा अंदाज क्रिसिल यांच्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याआधी या संस्थेने हाच अंदाज 3.5 टक्के इतका वर्तवला होता. आता नव्याने या अंदाजात संस्थेने महागाईचा स्तर कमी झालेला पाहून सुधारणा केली आहे. यावर्षी महागाई दरामध्ये साधारण 140 बेसिस पॉईंटची घसरण होऊ शकते. याची दखल घेत रिझर्व्ह बँकेला येणाऱ्या बैठकीमध्ये व्याजदरामध्ये कपात करण्याची संधी असणार आहे, असेही क्रिसीलने म्हटले आहे.
रेपो दरात कपातीची संधी
येणाऱ्या काळात रिझर्व्ह बँक 25 बेसिस पॉईंटने रेपो दरात कपात करू शकते. घटत्या महागाईसोबत कमी व्याजदरामुळे देशांतर्गत मागणीमध्ये आगामी काळात वाढ होणार असून जागतिक स्तरावरील आव्हानांना तोंड देण्यासाठी ही परिस्थिती सकारात्मक असणार आहे. परंतु खरीप हंगामामध्ये अधिक पावसाची चिंता मात्र कायम लागून राहिलेली असल्याचेही क्रिसिलने अहवालात नमूद केले आहे.
पावसाने पिकाचे नुकसान
पंजाब सारख्या भागामध्ये 40 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे फळे-भाज्या आणि इतर अन्नधान्यांच्या पिकावर परिणाम होऊ शकतो असाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये किरकोळ महागाई दर 2.1 टक्के इतका होता, जो यामागच्या जुलै महिन्यात 1.6 टक्के इतका होता.