महागाईने ‘बजेट’ डळमळले, तरीही उत्साह गणरायाचा!
अंतिम टप्प्यातील तयारीला जोर : गर्दीने खचाखच भरल्या बाजारपेठा
पणजी : गणेशचतुर्थी आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असून गोमंतकीयांच्या घरोघरी तयारीला जोर आला आहे. बाप्पांच्या आगमनाचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत असताना बाजारपेठेत मात्र दरवाढीने उसळी घेतली आहे. गणपतीसाठी लागणारे साखर, गुळ, रवा, मैदा, चणाडाळ, मूग, तुरडाळ या आवश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये प्रति किलो सरासरी पाच ते दहा ऊपयांची वाढ झाली आहे. चतुर्थी म्हणजे आनंद, उत्साह आणि घराघरात होणाऱ्या पदार्थांचा दरवळ. या दिवसांत विशेषत: नववधूंना वजेच्या निमित्ताने करंज्या, लाडू, धान्य यांची देणगी देण्याची परंपरा आहे.
सर्वांत महत्वाची नेवरीही महगली
वज्यामधील मुख्य पदार्थ म्हणजे नेवरी. नेवऱ्या तयार करण्यासाठी लागणारे मैदा, रवा, चणाडाळ तसेच गोडी आणण्यासाठी साखर आणि गूळ तसेच नारळाचा किसही आवश्यक असतो. मात्र या सर्व वस्तूंच्या दरात चढ-उतार झाल्याने गृहिणींची चांगलीच पंचाईत झाली आहे. बाजारात एक किलो गूळ 50 ऊपयांना मिळतो आहे. त्यावरूनच करंज्यांचा खर्च वाढल्याने विक्रीस येणाऱ्या तयार करंज्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. बाजारात वजेच्या करंजी तब्बल 60 ते 80 ऊपयांना एक अशी मिळत आहे.
तेल कंपन्यांची फसवेगिरी
फक्त गोडधोडच नव्हे, तर तेलाचे दरही ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. खुल्या बाजारात पामतेलाची एक लिटरची पिशवी 130 ऊपयांना मिळते. मात्र कंपन्यांनी मागील चार महिन्यांपासून एक लिटरऐवजी फक्त 750 मिलीचीच पिशवी विक्रीस आणली असून त्यावर एक लिटर तेलाचाच दर आकारला जात आहे. या फसव्या त्रहेच्या विक्रीमुळे ग्राहक नाराज झाले आहेत.
महगाई तरीही उत्सव
बाजारपेठामध्ये गर्दी वाढली आहे. सजावटीचे साहित्य, फुलं, मखरं, वस्त्र, मूर्ती यांसह मिठाईच्या दुकानांमध्येही गर्दी वाढली आहे. परंतु दरवाढीमुळे अनेक कुटुंबांना आपला खर्च जुळवताना कसरत करावी लागत आहे. सणाचा आनंद उत्साहात साजरा करण्याची सर्वांची इच्छा असली, तरी महागाईची ही छाया गणेशभक्तांना चांगलीच जाणवू लागली आहे. तसेच गणेश चतुर्थीच्या तोंडावर पावसाने विश्रांती घेतली आहे. रिमझिम थांबल्याने बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गर्दीतही खरेदीचा आनंद वाढला आहे.
पणजी बाजारपेठ सामानाचे दर
तुरदाळ 140 ऊ. किलो, चणा दाळ 100 ऊ, सफेद वाटाणे 85 ऊ, काबुवी चणे 140 ऊ, मुग 120 ऊ, रवा 45 ऊ, मैदा 45 ऊ, साखर 50 ऊ, हिरवा वाटाणा 140 ऊ, मसूर 90 ऊ तर पोहे 60 ऊ. अशा दराने विकले जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी राजधानीत सहकार भंडार व गोवा बागायतदार या संस्थांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी अक्षरश: झुंबड उडवली. सकाळपासून मोठ्या रांगा लागल्या होत्या. तुलनेने स्वस्त दरात सामान मिळत असल्याने लोकांनी उत्साहात खरेदी केली. मात्र गर्दी इतकी वाढली की काही ठिकाणी आवश्यक वस्तूंची कमतरता जाणवली, तर ब्रँडेड वस्तूंसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागली. या अफाट गर्दीचा परिणाम पार्किंग व वाहतुकीवर झाला असून पणजीत सगळीकडे ट्रॅफिकची कोंडी निर्माण झाली.
माटोळीचीच्या सामानाने बाजाल सजला
घराघरांत बांधल्या जाणारया माटोळीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. रानटी फळे, भाज्या, कंदमुळे आणि गावठी साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. गणेश चतुर्थी हा निसर्गाच्या सान्निध्यात नेणारा सण आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातून आलेल्या नैसर्गिक उत्पादनांना मोठी मागणी असून दर ठरलेले नसल्याने ग्राहक मिळेल त्या दराने खरेदी करताना दिसत आहेत.