बांगलादेश सीमेवरील घुसखोरी मोठे आव्हान
गृह मंत्रालयाच्या अहवालात नमूद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-बांगलादेश सीमेवर अवैध स्थलांतर तसेच सीमेपलिकडून होणाऱया कारवायांचे मोठे आव्हान असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारत-बांगलादेश सीमा एकूण 4096.7 किलोमीटर लांबीची असून यातील 3,145 किलोमीटर लांबीच्या सीमेवर तारेचे कुंपण बसविण्यात आले आहे. तर उर्वरित हिस्स्यावर घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
भारत-बांगलादेश सीमा घुसखोरीच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील आहे. बांगलादेशातून भारतात होणारी घुसखोरी आणि सीमेपलिकडून होणाऱया अवैध कारवाया रोखण्याचे मोठे आव्हान असल्याचे गृह मंत्रालयाच्या अहवालात म्हटले गेले आहे. मागील 5 वर्षांमध्ये 2,399 बांगलादेशी नागरिकांना अवैध मार्गाने भारतीय दस्तऐवजांचा वापर करताना पकडण्यात आले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना भारतात राहत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटविण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास सांगितले आहे. अवैध मार्गाने आधारकार्ड प्राप्त केलेल्या स्थलांतरितांचा तपशील पुरविण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.
भारतात सुमारे 2 कोटी बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी 16 नोव्हेंबर 2016 रोजी संसदेला सांगितले होते. बांगलादेश सीमेवर घुसखोरी, तस्करी आणि अन्य देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी केंद्र सरकारने तारेचे कुंपण निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच सीमेवर दोन टप्यांमध्ये फ्लडलाइटसोबत कुंपण बसविण्यास मंजुरी दिली आहे. हे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे गृह मंत्रालयाच्या अहवालात म्हटले गेले आहे.
अप्रत्यक्ष अवरोधक व्यवस्थेत तांत्रिक उपाय सामील असतील. तर जुन्या तारेच्या कुंपणाला नव्या डिझाइनने युक्त तसेच प्रभावी कुंपणाने बदलण्यासह मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. नदी अन् सखल भागांमध्ये कुंपण उभारण्याच्या कामात काही समस्या उद्भवल्याने या प्रकल्पाला विलंब झाल्याचे अहवालात नमूद आहे.
सीमावर्ती भागांमध्ये उत्तम संपर्क तसेच परिचालन गतिशीलतेसाठी रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. एकूण 4,223.04 किलोमीटर सीमावर्ती रस्त्यांपैकी आतापर्यंत 3,750.87 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. उर्वरित काम देखील मार्च 2024 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
केंद्र सरकारने पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये बांगलादेश सीमेवर फ्लड लाइट लावण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 3,077.54 किलोमीटर लांबीच्या सीमेवर फ्लडलाइट लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून यातील 2,681.99 किलोमीटर हिस्स्यावर काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित क्षेत्रात मार्च 2023 पर्यंत फ्लडलाइट लावण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. आसाम आणि पश्चिम बंगालला बांगलादेशातील घुसखोरीमुळे सर्वाधिक प्रभावित राज्य मानले जाते.