पहलगाम हल्ल्यासाठी पूंछमधून घुसखोरी
छायाचित्रांच्या आधारावरुन कारस्थान झाले उघड
वृत्तसंस्था / श्रीनगर
एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी पूंछच्या सीमावर्ती भागातून घुसखोरी केली होती, असे राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाच्या (एनआयए) चौकशीत उघड झाले आहे. हा हल्ला एका नव्या दहशतवादी गटाने केला होता. हा गट 2023 पासून या भागात सक्रीय होता. पूंछ भागाच्या देहरा की गली या अरुंद खिंडीतून या गटाच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती, असे एनआयएला आढळून आले आहे.
या गटाच्या हस्तकांनी जम्मू भागात 2024 पासून किमान तीन हल्ले सुरक्षा दलांच्या तुकड्यांवर केले आहेत. 2024 च्या उत्तरार्धात हा गट जम्मूमधून काश्मीर खोऱ्यात स्थलांतरीत झाला होता. या गटाने पहिला दहशतवादी हल्ला देहरा की गली येथेच केला होता. त्या हल्ल्यात भारतीय सेनेच्या चार सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. मे 2024 मध्ये या गटाने दुसरा हल्ला केला. तो सुरणकोट येथे भारतीय वायुदलाच्या वाहनताफ्यावर करण्यात आला. पूंछ येथे अनेक महिने दहशतवादी कृत्ये केल्यानंतर हा गट काश्मीरमध्ये स्थलांतरीत झाला.
बडगामध्ये विभागणी
काश्मीर खोऱ्यातील बडगाम येथे स्थिरावल्यानंतर या गटाची दोन भागांमध्ये विभागणी करण्यात आली. एक मोड्यूल गुलमर्गमध्ये कार्यरत होता. तर दुसरा सोनमर्गमध्ये दहशतवादी कृत्ये करण्यात मग्न राहिला. हे दोन्ही गट पहलगाम हल्ला करण्यासाठी पुन्हा एकत्र आले अशी माहिती देण्यात आली आहे.
पकडण्याचे प्रयत्न
हा गट अद्यापही काश्मीर खोऱ्यात अस्तित्वात आहे. त्यातील अनेक हस्तकांची छायाचित्रे एनआयएच्या हाती लागली आहेत. पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांनी ही छायाचित्रे ओळखली आहेत. या गटाचे तीन ते चार दहशतवादी पहलगाम हल्ल्याच्या आधीच तेथे पोहचले होते. त्यांनी या भागाचे निरिक्षण दोन ते तीन दिवस केले. त्यानंतर हल्ल्याची योजना अंतिम करुन 22 एप्रिल 2025 या दिवशी हल्ला करण्यात आला. निरपराध हिंदू पुरुष पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन या दहशतवाद्यांनी अत्यंत निर्घृणपणे गोळ्या घालून त्यांचा जीव घेतला होता. या दहशतवादी हल्ल्याचा सूड भारताने ‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून घेतला होता.