सांगलीत भरणार औद्योगिक प्रदर्शन! केंद्रीय मंत्री राणे, बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
सांगलीमध्ये 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2023 या चार दिवशी "उद्यम सांगली" या नावाने औद्योगिक प्रदर्शन होत आहे. केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु, आणि मध्यम मंत्रालयाच्या व लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हे प्रदर्शन कल्पद्रूप क्रीडांगण नेमिनाथ नगर येथे होत आहे. अशी माहिती लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. नीता केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत हेही प्रदर्शनाच्या निमित्ताने येणार आहे.
याबाबत रिसोर्सेस चे राजेश शहा आणि त्यांची टीम हे सर्व उभारणीचं काम आणि मार्केटिंगचं काम करत आहे. याच्या तयारीसाठी विविध ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात बैठका होत आहेत. मिरज एमआयडीसी येथे अशीच तयारीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला एमआयडीसीचे अध्यक्ष श्रीयुत खांबे सर, संजय आराणके , माजी अध्यक्ष दीपकबाबा शिंदे, उद्योजक हेमंत महाबळ, रौनक शहा, विनोद पाटील, पुरस्कार विजेत्या अर्चना पवार, उद्योग आघाडीचे रमेश आरवाडे, माजी महापौर सुरेश अण्णा पाटील, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अमोल पाटील आदी उपस्थित होते. याच्या उद्घाटनासाठी रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नामदार नारायणजी राणे हे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत उद्योग वाढीला चालना देणारे आणि उत्तम आदर्श असणाऱ्या नव उद्योजकांना प्रेरणा देणाऱ्या उद्योजकांचा सन्मान त्यांच्या हस्ते होणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी "रोजगार मेळावा " होत आहे. उद्योगांना लागणारे मनुष्यबळ आणि तांत्रिक तज्ञ यांची नोंदणी व रोजगार तसेच यांना मार्गदर्शनासाठी नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्चतंत्र शिक्षण मंत्री हे येणार आहेत.
मंगळवार दिनांक 28 रोजी उद्योग मंत्री उदय जी सामंत यांच्या उपस्थितीत "उद्योग परिषद" होणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनात खास महिला स्टार्टअप व महिला उद्योजक यांना मार्गदर्शन आणि त्यांचा सत्कार असा कार्यक्रम आहे. या संपूर्ण प्रदर्शनाला महाराष्ट्रातून येणारे विविध उद्योजक, विद्यार्थी आणि नागरिक यांच्या भेटीमुळे या प्रदर्शनातून वितरक मिळावेत असा प्रयत्न आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या विविध उद्योग क्षेत्रातील म्हणजेच टेक्स्टाईल, डेअरी, साखर उद्योग, औषध उद्योग, वीज निर्मिती उपकरणे, निर्यात क्षम उत्पादने, संरक्षण दलासाठी जाणारी उत्पादने, यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला व्हावी यासाठी याचा उद्देश आहे. सांगली जिल्ह्यातील
उद्योजकांचे प्रश्न सुटावेत प्रलंबित मागण्यांकडे पाठपुरावा करावा आणि सांगली जिल्ह्यात आणखीन ताकदीने उद्योगांच्या उभारणीसाठी प्रयत्न व्हावे हा पण उद्देश आहे. प्रत्येक तालुक्याची ओळख आणि तिथून होणाऱ्या उत्पादनांचा सहभाग यामध्ये असावा असे प्रयत्न चालू आहेत असेही नीता केळकर यांनी सांगितले. यावेळी उद्योग आघाडीचे स्वप्नील शहा, रमेश आरवाडे आदी उपस्थित होते.