कडोली येथे इंद्रायणी भाताला 3000 रु. दर जाहीर
वार्ताहर/कडोली
इंद्रायणी भाताला किमान 3000 रुपये दर मिळावा, यासाठी येथील स्वाभीमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. येथील एका भात व्यापाऱ्यातर्फे 3000 रुपये दर देवून भात खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांत समाधान पसरले आहे. भात सुगी आणि मळणीच्या कामांना जोरात सुरू होताच अवघ्या आठच दिवसांत इंद्रायणी भाताचा दर 800 रुपयांनी कमी केल्यानंतर येथील स्वाभीमानी शेतकरी संघटनेने उठाव केला आणि भात व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. भाताला 3000 रुपये द्यायचा असेल तरच भात खरेदी करा, असा इशारा देण्यात आला होता. शिवाय या लढ्याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध करून जागरुकता निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच येथील भात उत्पादक शेतकऱ्यांना याची कल्पना मिळावी यासाठी रॅलीही काढण्यात आली. याची दखल घेवून येथील भात व्यापाऱ्याने आपल्या वरिष्ठ पातळीवरील व्यापाऱ्यांना याची कल्पना दिली. 3000 रुपये दर देण्याचे मान्य झाल्यावर सोमवारी त्यांनी 3000 रुपये दराने भात खरेदी करण्याचे कार्य सुरू झाले. या निर्णयामुळे बेळगाव तालुक्यासह खानापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ होण्यास मदत होणार आहे.