भारतापेक्षा इंडोनेशिया अधिक धार्मिक देश
या देशात लोक दररोज करतात प्रार्थना : संशोधनाचा दावा
वृत्तसंस्था/ जकार्ता
भारतात 60 टक्के लोक स्वत:च्या धर्मानुसार दैनंदिन प्रार्थना करतात. प्यू रिसर्च सेंटरकडून जगातील 100 हून अधिक देशांमध्ये धर्माच्या महत्त्वावर करण्यात आलेल्या अध्ययनात ही बाब नमूद करण्यात आली आहे. अहवालानुसार इंडोनेशियाचे लोक सर्वाधिक तर जपानचे लोक सर्वात कमी धार्मिक आहेत.
2008-23 या दरम्यान करण्यात आलेल्या अध्ययनानुसार सर्वाधिक दक्षिण अमेरिकन लोकांनी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. ग्वाटेमाला आणि पराग्वेमध्ये 82 टक्के तर कोस्टा रिका आणि होंडुरासमध्ये 78 टक्के लोकांनी नित्यप्रार्थना करत असल्याचे मान्य केले. अमेरिकेत 45 टक्के प्रौढ व्यक्तींनी नियमित प्रार्थना करत असल्याचे नमूद केले. सर्वेक्षणात सामील पूर्व आशियाई देश (जपान, चीन, मंगोलिया, उत्तर तसेच दक्षिण कोरिया आणि तैवान) येथील केवळ 21 टक्के प्रौढ व्यक्तींना आपण नियमित प्रार्थना करत असल्याचे सांगितले आह. यात हाँगकाँगमधील 13 टक्के तर जपानमधील 19 टक्के लोक सामील आहेत.
अशाच प्रकारे जगातील 80 टक्क्यांहून अधिक लोकांनी स्वत:च्या जीवनात धर्माचे महत्त्वपूर्ण स्थान असल्याचे मानले आहे. उपसहारा आफ्रिकेतील सेनेगल, माली, टांझानिया, जाम्बियामध्ये 90 टक्क्यांहून अधिक लोकांच्या मतानुसार धर्माचे त्यांच्या जीवना अत्यंत अधिक महत्त्व आहे. धर्मामुळे स्वत:च्या दैनंदिन जीवनात अनेक बदल घडत असल्याचे त्यांचे सांगणे आहे. याच्या उलट सर्वेक्षणात सामील जवळपास सर्व युरोपीय देशांमध्ये लोकांनी धर्माला अधिक महत्त्व दिले नाही. एस्टोनिया, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, स्वीत्झर्लंड, ब्रिटन, स्वीडन, लातविया आणि फिनलंडमध्ये 10 टक्के किंवा त्याहून कमी लोकांनी नित्यप्रार्थनेची बाब स्वीकारली आहे.
इंडोनेशियातील जवळपास प्रत्येक प्रौढ व्यक्तीने आयुष्यात धर्माला अत्यंत महत्त्व असल्याचे सांगितले आहे. तर सिंगापूरमध्ये हे प्रमाण केवळ 36 टक्के आणि व्हिएतनाममध्ये 26 टक्के इतके राहिले आहे. तर 42 टक्के अमेरिकन नागरिकानी याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
भारतीय आहाराबद्दल अधिक सतर्क
भारतात सुमारे 30 हजार प्रौढांना धर्माशी संबंधित आहार पर्यायांबद्दल विचारण्यात आले. भारतीय लोक आहाराबद्दल अधिक सतर्क असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. पूर्ण आशिया क्षेत्रातील बहुतांश लोक आध्यात्मिक विश्वास बाळगून असून पारंपरिक विधी करतात.