प्राग विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार, 15 ठार
हल्लेखोराचाही मृत्यू : 24 जण गंभीर जखमी
वृत्तसंस्था/ प्राग
झेक प्रजासत्ताकमधील एका विद्यापीठात एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावर अन्य कुणी बंदुकधारी नसल्याने कुठलाच धोका नसल्याचे झेक प्रजासत्ताकचे गृहमंत्री विट राकुसन यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी लोकांना पोलिसांसोबत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जन पलाच स्क्वेअरमध्ये गोळीबार झाल्याने अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. चार्ल्स विद्यापीठाचा एक हिस्सा खाली करविण्यात आला असून परिसरातील वाहतूक रोखण्यात आली आहे. परिसरातील लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन झेक पोलिसांनी केले आहे. आरोपी हल्लेखोर हा विद्यापीठाचाच विद्यार्थी होता असे समोर आले असून त्याचे नाव डेव्हिड कोजाक होते.
डेव्हिड हा प्रागच्या चार्ल्स विद्यापीठात पोलिश इतिहासाचे शिक्षण घेत होता. हल्लेखोर विद्यार्थी शिक्षणात अत्यंत हुशार होता आणि त्याची कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती अशी माहिती प्राग पोलीस प्रमुख मार्टिन वोंदरासेक यांनी दिली आहे. आरोपीकडे अनेक आधुनिक शस्त्रास्त्रांचे परवाना होते, नरसंहाराच्या उद्देशानेच तो विद्यापीठात पोहोचला होता असे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपी हल्लेखोर हा प्रागपासून काही अंतरावर असलेल्या होसटोन भागाचा रहिवासी होता. आरोपीच्या घरातून त्याच्या वडिलांचा मृतदेह हस्तगत झाला आहे. हल्लेखोराने विद्यापीठात गोळीबार करण्यापूर्वी घरात स्वत:च्या वडिलांची हत्या केल्याचे मानले जात आहे.