For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंदिरा किटमध्ये मुगाऐवजी अतिरिक्त तूरडाळ

10:37 AM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
इंदिरा किटमध्ये मुगाऐवजी अतिरिक्त तूरडाळ
Advertisement

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारचे पाऊल : लवकरच अंमलबजावणी

Advertisement

बेंगळूर : अन्नभाग्य योजनेंतर्गत 5 किलो अतिरिक्त तांदळाऐवजी इंदिरा आहार किट देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. इंदिरा पोषण आहार किटमध्ये मुगाऐवजी अतिरिक्त तूरडाळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती 5 किलो अतिरिक्त तांदूळ दिले जात होते. याकरिता सरकारने 6,426 कोटी रुपये अनुदान निश्चित केले हेते. तांदळाऐवजी तूरडाळ, मूग, खाद्यतेल, साखर, मीठ यांचा समावेश असणारे इंदिरा किट देण्याचा निर्णय घेतला होता.  याकरिता 6,119 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यामुळे 307 कोटी रुपयांची बचत होणार होती.

राज्यातील तूर उत्पादकांचे हित आाणि रेशनकार्डधारकांना प्रथिनेयुक्त धान्य देण्यासाठी मुगासाठी होणाऱ्या खर्चाइतक्या रकमेतून अतिरिक्त तूरडाळच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी इंदिरा किटमध्ये 1 किलो तूरडाळ, 1 किलो मूग, 1 लिटर खाद्यतेल, 1 किलो साखर, 1 किलो मीठ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता 1 किलो मुगाऐवजी 1 किंवा 2 सदस्य असणाऱ्या कुटुंबाला पाव किलो अतिरिक्त तूरडाळ, 3 किंवा 4 सदस्य असणाऱ्या कुटुंबाला अतिरिक्त अर्धा किलो तूरडाळ तसेच 5 किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य असणाऱ्या कुटुंबाला पाऊण किलो अतिरिक्त तूरडाळ दिले जाईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री शरणप्रकाश पाटील, माहिती तंत्रज्ञान-जैविक तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे यांच्यासह इतर मंत्र्यांनी उत्तर कर्नाटक भागात तूर हे प्रमुख पीक आहे. येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी मुगाऐवजी तूरडाळ वितरण करणे योग्य आहे, असे मत मांडले. त्यामुळे इंदिरा किटमधील मूग वगळून तितक्याच रकमेतून अतिरिक्त तूरडाळ वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.