For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

10 तारखेपूर्वी मिळणार इंदिरा आहार किट

10:33 AM Dec 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
10 तारखेपूर्वी मिळणार इंदिरा आहार किट
Advertisement

मुख्यमंत्र्यांची अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेंगळूर : राज्य सरकारने अन्नभाग्य योजनेंतर्गत 5 किलो अतिरिक्त तांदळाऐवजी ‘इंदिरा आहार किट’ देण्याचा निर्णय घेतला आहे. समग्र पोषण आणि आहार पद्धती उपक्रमांतर्गत इंदिरा आहार किट वितरण केले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपूर्वी हे आहार किट वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बेंगळूरमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इंदिरा आहार किट योजनेच्या अंमलबजावणीबाबत बैठक पार पडली. सिद्धरामय्या यांनी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्या. मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने अन्नभाग्य योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपूर्वी हे किट वितरित करावे. अतिरिक्त तांदळाच्या बदल्यात तूरडाळ, सूर्यफूल तेल, साखर आणि मीठ वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

18,628 टन तूरडाळ आवश्यक

Advertisement

प्रत्येक महिन्याला इंदिरा आहार किटसाठी 18,628 मेट्रिक टन तूरडाळ, 12,419 मे. टन खाद्यतेल, साखर, मीठ आवश्यक आहे. पोषक घटकांचा समावेश असणारी तूरडाळ वितरण करणे आवश्यक आहे. केंद्रीय आहार उत्पादन पुरवठा संस्थेमार्फत खरेदी प्रक्रिया होणार असून ती केटीपीपी अंतर्गत पारदर्शकपरणे राबविण्यासाठी पावले उचला, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नये. सदर पदार्थ कमी पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तक्रारी येणार नाहीत, अशा रितीने ही योजना राबविली जावी. प्रत्येक रेशन दुकानात क्युआर कोड स्कॅनिंग बसवावे. याच्या आधारावर लाभार्थ्यांना आहार किट वितरित करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. फेब्रुवारी महिन्यापासून हे किट वितरित होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.