इंडिगोच्या नफ्यात 11 टक्के घसरण
2727 कोटीचा जून तिमाहीत कमावला नफा : प्रवासी संख्येत वाढ
नवी दिल्ली :
हवाई क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंडिगोने आपला जून तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीच्या नफ्यामध्ये 11 टक्के इतकी घट दिसून आली आहे. वाढत्या खर्चामुळे कंपनीला नफ्यामध्ये घसरण अनुभवता आली आहे.
नव्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जूनमध्ये पहिल्या तिमाहीत इंडिगो एअरलाइन्सने 2727 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागच्या वर्षी याच समान अवधीत कंपनीने 3087 कोटी रुपये नफा कमावला होता. इंटरग्लोब एव्हिएशनची इंडिगो ही विमान कंपनी आहे. मागच्या तिमाहीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली होती परंतु कंपनीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा थेटपणे नफ्यावरती परिणाम दिसून आला, असे कंपनीने म्हटले आहे.
इतका झाला खर्च
मागच्या महिन्यातच कंपनीने खर्चामध्ये 3.8 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कंपनीचा जूनच्या तिमाहीत खर्च 24 टक्के वाढत 17449 कोटी रुपयांवर पोहोचला. याच दरम्यान कंपनीने महसुलात 17 टक्के वाढ केली असून तो 19571 कोटी रुपये मिळवला आहे.
विमान प्रवासी वाढले
इंडिगोच्या विमान प्रवासी संख्येमध्ये 11 टक्के वाढ दिसून आली आहे. कंपनीला अंदाज होता की प्रवासी संख्या दहा ते बारा टक्के वाढेल. पुढील तिमाहीत विमान प्रवाशांची संख्या जरी वाढणार असली तरी या तिमाहीच्या तुलनेमध्ये ती कमी असेल असेही कंपनीने म्हटले आहे.