इंडिगो एअरलाईनने कमावला 3067 कोटींचा नफा
चौथ्या तिमाहीचा निकाल घोषित : 22151 कोटीचा कमावला महसुल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवाई क्षेत्रातील कंपनी इंडिगो एअरलाईन यांनी आपला आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून 3067 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कंपनीने कमावला आहे. मागच्या वर्षी या अवधीमध्ये कंपनीने 1894 कोटी रुपयांचा एकत्रित नफा कमावला होता.
महसुलातही दमदार कामगिरी
देशांतर्गत विमान वाहतुकीत झालेली वाढ यामुळे नफा चांगला कमावता आलेला आहे, असे म्हटले जात आहे. याच दरम्यान कंपनीने एकत्रित महसुलामध्येसुद्धा 24 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता चौथ्या तिमाहीमध्ये इंडिगोने 22151 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत 17825 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. विमान वाहतुकीच्या क्षेत्रात देशातील आघाडीवरची हवाई कंपनी इंडिगोने तिकीट महसुलाच्या माध्यमातून 19567 कोटी रुपये कमावले आहेत. कंपनीने या तिमाहीत दररोज 2304 विमान फेऱ्या राबवल्या आहेत.
एप्रिलमध्ये प्रवासी संख्येत 8 टक्के वाढ
याचदरम्यान गेल्या एप्रिल महिन्यात विमान प्रवासी संख्येमध्ये 8 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये भारतीय हवाई कंपन्यांनी एकंदर 143.6 लाख प्रवाशांना विमान प्रवास घडवला आहे. मागच्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेमध्ये पाहता विमान प्रवाशांची संख्या 8.4 टक्के इतकी वाढलेली आहे. विमान वाहतुकीतील बाजारातील हिस्सेदारी पाहता अर्थातच इंडिगोने बाजी मारलेली आहे. विमान वाहतुकीमध्ये इंडिगोने 64 टक्क्यांसह निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. यानंतर एअर इंडियाने 27 टक्के आणि अकासा एअरने 5 टक्के व स्पाइसजेट यांनी 2.6 टक्के इतका वाटा उचलला आहे.
आर्थिक वर्षाची कामगिरी
31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने 7258 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या आर्थिक वर्षांमध्ये कंपनीने 8172 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने 17 टक्के वाढीसह 80 हजार 802 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.