निवडणुकांच्या अगोदर भाजपमध्ये सूचक हालचाली
‘मला पंतप्रधानपदाची ऑफर विरोधी पक्षांकडून आली होती पण मी ती नाकारली’, हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य म्हणजे भाजपमध्ये नेतृत्वाचे आपण उमेदवार आहोत असेच त्यांनी एकप्रकारे जाहीर केलेले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्याबाबतची भीती नाहीशी झालेलीच आहे या विरोधी पक्षांच्या दाव्याला गडकरीसाहेबांनी सत्ताधारी पक्षातच खरे करून दाखवले आहे. गडकरींची खूबी अशी की त्यांना कोणताही मेसेज हा हसतखेळत देता येतो. कोणतीही आदळआपट न करता बदलत्या काळात आपण भाजपचे ‘वाजपेयी’ बनू शकतो असे त्यांनी सांगितले आहे.ज्याला ऐकायचे आहे त्यांनी ऐका. कोणी ऐकले नाही तर त्यांच्या होणाऱ्या नुकसानीला आपण जबाबदार नाही, असेच त्यांचे सांगणे होय.
गडकरी यांनी दिल्लीला हा मेसेज नागपूरहून दिला हेही तेव्हढेच महत्त्वाचे आहे. भाजपच्या जीवनात नागपूरचे स्थान अनन्यसाधारण आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. मोदी पंतप्रधान झाले ते नागपूरच्या पाठिंब्याने पण नंतर त्यांनी आपले नाणे एव्हढे खणखणीत केले की संघ बाजूला पडला, त्याला बाजूला टाकले गेले अशी काहीशी स्थिती उद्भवली. जून 4 च्या निकालांनी संघात संजीवनी आणण्याचे काम केले आहे. मोहन भागवत यांच्या चेहऱ्यावर नवीन तुकतुकी आलेली आहे.
गडकरींच्या ताज्या वक्तव्याला फारशी हवा भाजप नेतृत्वाने जाणीवपूर्वक दिलेली नाही याचा अर्थ त्याकडे डोळेझाक केलेली आहे असे नव्हे. ‘मोदी के इजाजत के बीना भाजपमें कोई परिंदा भी पर नहीं मार सकता’ असे काल परवापर्यंत मानणाऱ्या भक्तमंडळींच्या डोळ्यात अंजन घालण्याचे कामच गडकरीसाहेबांनी केलेले आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून तीन महिने उलटून गेले तरी मोदींना भाजपचा नवीन अध्यक्ष बनवता आलेला नाही हा केवळ अपघात नव्हे. मोदींच्या सुगीच्या दिवसात बाजूला टाकले गेलेले त्यांचे संजय जोशी यांच्यासारखे संघातील विरोधक दुप्पट जोमाने कामाला लागले आहेत. ते शांतपणे काम करत आहेत इतकेच. ते किती यशस्वी होतात ते येणारा काळ दाखवेल, पण पहिल्यासारखे मोदींचे नाणे खणखणीत राहिलेले नाही हे तेव्हढेच खरे.भाजपच्या संसदीय दलाची बैठक न घेता मोदी यावेळेला पंतप्रधान झाले ही गोष्ट चाणाक्ष राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून सुटलेली नाही.
गडकरींनी ही चाल अशावेळी खेळली की नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी म्हणून पुढे येण्याची खेळी गृहमंत्री अमित शहा खेळू लागले आहेत, असे स्पष्ट दिसत आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षांच्या प्रचारात अरविंद केजरीवाल यांनी मोदींना आता शहा यांना पंतप्रधान करायचे आहे असे म्हणून ठिणगी टाकली आहे. त्यानंतर हालचाली सुरु झाल्या आहेत. शहा यांना ‘राम’ बनवून मोदींना ‘परशुरामाचा’ रोल घ्यायचा आहे. पुढील राष्ट्रपती निवडणूक आली की द्रौपदी मुर्मू यांच्या जागी आपणाला स्थानापन्न करायचे आणि शहा यांच्याकडे देशाची सूत्रे सोपवायची खेळी मोदी खेळू शकतात असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पंडित नेहरूंप्रमाणे तिसऱ्यादा पंतप्रधान बनण्याचे स्वप्न मोदींनी साकार केलेले आहे. मोदींनी नुकतेच 75व्या वर्षात पदार्पण केलेले आहे आणि त्यांचा भावी काळ आव्हानात्मक आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.
मोदींच्या वाढदिवसादिवशीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाणूनबुजून राजीनामा देऊन पंतप्रधानांची हवाच काढून घेण्याचे काम केले आहे. मला तुम्ही कितीही तुरुंगात घातले तरी मी तुम्हाला पुरून उरणार आहे असा काहीसा संदेश ते मोदींना देत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ जणू त्यांनी मोदींच्या वाढदिवशी फोडून पंतप्रधानांना अवलक्षण केलेले आहे. अलीकडील काळात महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे वाढलेले प्रस्थ म्हणजे अमित शहा हे जाणूनबुजून देवेंद्र फडणवीस यांना कमकुवत करून आपल्या भावी प्रतिस्पर्ध्याला अगोदरच नामोहरम करण्याचे काम करत आहेत असे मानले जाते.
ज्या गडकरींना महाराष्ट्राच्या राजकारणात मोडीला काढण्याचे राजकारण मोदी-शहा यांनी केले ते आता अंगलट येत आहे. गडकरींना खास प्रचारक म्हणून महाराष्ट्रात उतरवण्याचे भाजपचे मनसुबे ऐकू येत असताना ‘चतकोराने मला न सुख’ असेच ते म्हणत आहेत.
जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यात निवडणूका सुरु आहेत. तेथील भाजपमध्ये एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर झालेले बंड म्हणजे मोदी-शहा यांची पक्षावरील पकड निसटत आहे असाच होतो. हरियाणामध्ये काँग्रेसमधून आलेल्या
बऱ्याचजणांना भाजपने तिकिटे दिल्याने निष्ठावंत पक्षाला मोठ्या प्रमाणावर सोडचिठ्ठी देत आहेत असे विचित्र चित्र दिसत आहे. अनिल वीज यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला सायडिंगला टाकून दिल्याने नायबसिंग सैनी यांच्याबरोबर आपण मुख्यमंत्री पदाकरिता मुकाबला करणार हे त्यांनी अगोदरच जाहीर केलेले आहे.
तीन महिने झाले तरी मोदींचा पंतप्रधान म्हणून जमच बसत नाही असे विचित्र चित्र दिसत आहे. कोणताही मंत्री काही खास काम करत आहे असे दिसत नाही. बऱ्याच मंत्र्यांना आपली पूर्वीची मंत्रालये नको होती पण तीच मिळाल्याने ते हैराण झालेले आहेत. कोणालाही बोलताही येत नाही अशी अवघड आणि अशुद्ध अवस्था आहे. पंतप्रधान स्वत:च दिग्मूढ झाल्यासारखे वाटत असल्याने ते कोणाला मार्गदर्शन कसे करणार? हा कळीचा प्रश्न आहे. पूर्वी कोणत्याही इव्हेंटने बाजी मारणारे मोदी लुप्त पावले आहेत.
फडणवीस यांच्याप्रमाणे शहा हे योगी आदित्यनाथ यांच्याविषयी खार खाऊन असतात असे भाजपच्या वर्तुळात देखील मानले जाते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हिंदुत्वाचे पोस्टर बॉय असल्याने शहा यांच्यासारख्या कोणालाही ते मानणारे नव्हेत. उत्तरप्रदेशमध्ये शहा यांना फारशी लुडबुड करू न देण्याचे धोरण योगींनी सक्तीने राबविल्याने शहा हे तेथून दूर राहण्याचेच काम करतात. योगी हे स्वत:ला मोदींचे नैसर्गिक उत्तराधिकारी मानतात आणि भक्तमंडळींमध्ये त्यांची कमाल लोकप्रियता आहे. अलीकडील काळात केंद्रीय मंत्री झालेले शिवराज सिंग चौहान हे स्वत:ला प्रखर मोदी समर्थक भासवून आपले घोडे पुढे दामटत आहेत. गुजरातपेक्षा मध्यप्रदेशमधून लोकसभेचा निकाल चांगला लागल्याने चौहान हे स्वत:ला आपल्या राज्याचा अनभिषक्त नेता भासवून आपली महत्वाकांक्षा दाखवत आहेत. राज्यात त्यांनी भल्याभल्यांना वाटेला लावले असले तरी नवी दिल्लीच्या राजकारणात ते नवखे आहेत. अमित शहा यांच्या नावावर पक्षात एकमत होणार नाही अशावेळी मोदी आपल्याला मदत करतील अशी अपेक्षा शिवराज बाळगून आहेत्.ा प्रत्येकाचे आपापले गणित आहे, आडाखे आहेत.
मोदी पंचाहत्तरीत पदार्पण करत असताना अनपेक्षितपणे गडकरी यांनी या लढाईला तोंड फोडले आहे. ज्या गडकरींना गेली दहा वर्षे एकापेक्षा एक मानहानी पक्षात आणि सरकारमध्ये झेलावी लागली ते आता पुरता हिशेब घेत आहेत असे दिसते. पंतप्रधानांना हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. ‘पीएम बनने के मनसूबे गडकरी कई सालों से बना रहे हैं, बस, जुबां पर आज दिल की बात आ गयी!’, असे मोदी विरोधक म्हणत आहेत. मोदी मार्गदर्शक मंडळात जाणार की पक्षातील आपल्या विरोधकांना तिथे घालवणार याबाबत उलटसुलट वृत्ते येत असताना भाजपअंतर्गत काही फारसे ठीक चाललेले नाही. दिल्ली आणि महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या निवडणुकानंतर कलह वाढण्याची चिन्हे असतानाच ‘वन नेशन, वन इलेक्शन’चे नवीन तुणतुणे घेऊन पंतप्रधान पुढे आले आहेत.
सुनील गाताडे