शिवकुमारांचे प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत
बेंगळूरमधील कार्यक्रमात वाच्यता : काँग्रेस कार्यकर्त्यांचा आक्षेप
बेंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. डी. के. शिवकुमारांच्या या अनपेक्षित विधानामुळे कार्यक्रमात सहभागी झालेल्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही जणांनी आक्षेप घेतला. अखेर शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.
बुधवारी बेंगळूरमधील काँग्रेस भवनमध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मदिवस कार्यक्रमप्रसंगी बोलताना शिवकुमार यांनी, केपीसीसीच्या अध्यक्षपदी मी कायमस्वरुपी राहण्यास इच्छुक नाही. 2020 मध्ये मी केपीसीसीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार हाती घेतला होता. हे पद स्वीकारून आता पाच वर्षे पाच महिने पूर्ण झाली आहेत.
2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री बनलो, तेव्हाच केपीसीसीचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार होतो. परंतु, वरिष्ठ नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सूचनेवरून या पदावर राहिलो. येत्या मार्चमध्ये पदग्रहणाला सहा वर्षे पूर्ण होतात. इतरांनाही संधी द्यायला हवी, असे ते म्हणाले.
शिवकुमार यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे अप्रत्यक्ष सुतोवाच केल्याने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यावेळी काही जणांनी आक्षेप घेतला. तेव्हा शिवकुमार यांनी मी आहे की नाही, हे महत्त्वाचे नाही. पद सोडले तरी पक्षाच्या आघाडीवर उभे राहून काम करेन. मी कुठे आहे, कोण आहे, हे महत्त्वाचे नाही. माझ्या कार्यकाळात झालेली कामे कायमस्वरुपी राहतील. पक्षाचे 100 भवन निर्माणाचे काम सुरू केले आहे, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.
पुढील वेळीही काँग्रेसला सत्ता
बिहार निवडणूक निकालाचा उल्लेख करताना ते म्हणाले, राज्यात काँग्रेसची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. निश्चितच कर्नाटकात पक्षाची सत्ता पुढील वेळीही अबाधित राहील. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावू नये. मी कोठेही पलायन करणार नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रम संपल्यानंतर डी. के. शिवकुमार काँग्रेस भवनमधून बाहेर पडताच त्यांच्या समर्थकांनी ‘शिवकुमार हेच पुढील मुख्यमंत्री’ अशी घोषणाबाजी केली.