मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे संकेत
वाल्मिकी समुदायातील आमदाराला स्थान शक्य : मुख्यमंत्रिपद शाबूत असल्याचा सिद्धरामय्यांचा संदेश
बेंगळूर : काँग्रेस पक्षात अधिकार हस्तांतर, सप्टेंबर क्रांतीच्या मुद्द्यावर पडदा टाकून सिद्धरामय्या यांनी पुढील अडीच वर्षे कालावधीतही मीच मुख्यमंत्री पदावर राहणार असल्याचे सांगितले होते. म्हैसूर दसरोत्सव कालावधीत सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी आता मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे संकेत दिले असून आपले स्थान अबाधित असल्याचा संदेश दिला आहे. महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त बेंगळूरमधील आमदार भवन आवारातील वाल्मिकी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी आगामी दिवसांत मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे स्पष्ट संकेत दिले. वाल्मिकी समुदायातील एका आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी असल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, पुढे मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्यावेळी वाल्मिकी समुदायाला मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. राज्यात नोव्हेंबरमध्ये क्रांती होईल, अधिकार हस्तांतराबाबतच्या कराराचे पालन होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत वक्तव्य केल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.
यापूर्वी अनेक वेळा सिद्धरामय्या यांनी पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्रिपदी राहणार असल्याची विधाने केली आहेत. म्हैसूर दसऱ्यावेळीही त्यांनी याचा पुनरुच्चार केला होता. पुढील वर्षीही म्हैसूर दसरोत्सवावेळी चामुंडेश्वरी देवीला पुष्प अर्पण करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. दुसरीकडे सिद्धरामय्यांच्या समर्थकांनी सिद्धरामय्या हेच पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री पदावर राहणार असल्याची वक्तव्ये केली आहेत. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री बनावे, अशी वक्तव्ये त्यांच्या समर्थकांनी केली. पक्षात अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावर हायकमांडने सध्यातरी मौन बाळगले आहे. परंतु, सोमवारी या मुद्द्यावर राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी नेतृत्त्व बदलाबाबत कोठेही चर्चा झाली नसल्याचे सांगून राज्यात मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचना करणार असल्याचे सांगून आपले पद शाबूत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ पुनर्रचना केव्हा होणार, कोणाला मंत्रिपद मिळणार याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
हायकमांडने गोंधळ दूर करावा : डॉ. परमेश्वर
राज्यात चर्चा होत असलेल्या अधिकार हस्तांतर आणि संबंधित गोंधळाचे हायकमांडने निराकरण करावे, अशी मागणी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केली आहे. बेंगळूरमध्ये बुधवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकार हस्तांतराविषयी असणारा गोंधळ दूर करण्याबाबत पेलेले वक्तव्य योग्यच आहे. दररोज प्रसारमाध्यमांसमोर अनेकजण वेगवेगळी विधाने करत आहेत. काँग्रेस हायकमांडचे याकडे लक्ष आहे. त्यामुळे याविषयी असलेला गोंधळ दूर करणे योग्य ठरेल, असे डॉ. परमेश्वर यांनी म्हटले आहे.