For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची टी-20 मालिकेत विजयी सलामी

06:05 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताची टी 20 मालिकेत विजयी सलामी
Advertisement

अफगाणिस्तानचा सहा गड्यांनी पराभव : शिवम दुबेचे नाबाद अर्धशतक, जितेश शर्माच्या 20 चेंडूत 31 धावा, अक्षर पटेल, मुकेश कुमारचे प्रत्येकी 2 बळी

Advertisement

वृत्तसंस्था /मोहाली

सामनावीर शिवम दुबेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारताने अफगाणचा 15 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. उभय संघातील ही पहिलीच टी-20 मालिका खेळविली जात आहे. मोहालीच्या स्टेडियमवर या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून अफगाणला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय गोलंदाजीसमोर अफगाणची सलामीची जोडी कर्णधार इब्राहिम झद्रन आणि गुरबाज यांनी डावाला चांगली सुरूवात करुन देताना 8 षटकात अर्धशतकी भागिदारी केली. पण त्यानंतर भारताच्या गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. 20 षटकात अफगाणने 5 बाद 158 धावा जमवित भारताला विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले. भारताने 17.3 षटकात 4 बाद 159 धावा जमवित आपला विजय सहज नोंदविला.

Advertisement

अफगाणच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकात त्यांनी एकही गडी न गमविताना 33 धावा जमविल्या. अफगाणचे अर्धशतक तसेच गुरबाज आणि झद्रन यांची अर्धशतकी भागिदारी 46 चेंडूत नोंदविली गेली. अक्षर पटेलने अफगाणची ही सलामीची जोडी फोडताना गुरबाजला जितेश शर्माकरवी यष्टीचीत केले. त्याने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. गुरबाज बाद झाल्यानंतर कर्णधार झद्रन अधिक वेळ खेळपटीवर राहू शकला नाही. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर कर्णधार झद्रन रोहित शर्माकरवी झेलबाद झाला. त्याने 22 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. अक्षर पटेलने रेहमत शहाचा 3 धावावर त्रिफळा उडविला. अफगाणने 10 षटकाअखेर 3 बाद 57 धावा जमविल्या होत्या.

ओमरझाई आणि मोहम्मद नबी यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी  43 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. मुकेशकुमारच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात ओमरझाई त्रिफळाचीत झाला. त्याने 22 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 29 धावा जमविल्या. मुकेशकुमारने अफगाणच्या डावातील 17 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर ओमरझाईला बाद केल्यानंतर याच षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने मोहम्मद नबीला झेलबाद केले. त्याने 27 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 42 धावा जमविल्या. नजिबुल झद्रन आणि जेनत यांनी शेवटच्या 2 षटकात 28 धावा जमविल्या. नजिबुल झद्रनने 11 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 19 तर करीम जनतने 5 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 9 धावा जमविल्या. अफगाणच्या डावात 8 अवांतर धावा भारताने दिल्या. त्यांच्या डावामध्ये 6 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. मोहलीमध्ये या सामन्यावेळी अधिक थंडी जाणवत होती. भारताचे क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले नाही. भारताकडून अफगाणला 3 जीवदाने मिळाली. सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल दुखापतीमुळे या सामन्यासाठी उपलब्ध राहू शकला नाही. भारतातर्फे मुकेशकुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबेने 1 गडी बाद केला. अफगाणच्या रेहमत शहाचे टी-20 प्रकारात पदार्पण झाले. यापूर्वी त्याने अफगाणकडून 106 वनडे सामने खेळले आहेत. अफगाणच्या वरच्या फळीतील फलंदाजांना धावफलक सातत्याने हलता ठेवता आला नाही.

भारताची खराब सुरुवात

भारताच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेताना गिलकडून साथ न मिळाल्याने कर्णधार शर्माला आपले खाते उघडण्यापूर्वी तंबूत धावचीत होऊन परतावे लागले. गिल आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 21 चेंडूत 28 धावांची भागिदारी केली. मुजिबुर रेहमानच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात गिल गुरबाजकरवी यष्टीचीत झाला. त्याने 12 चेंडूत 5 चौकारांसह 23 धावा जमविल्या. भारताची स्थिती यावेळी 3.5 षटकात 2 बाद 28 अशी होती. भारताने पहिल्या

पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 36 धावा जमविताना 2 गडी गमविले. भारताचे अर्धशतक 42 चेंडूत फलकावर लागले. डावातील 9 व्या षटकात तिलक वर्मा ओमरझाईच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तिलक वर्माने 22 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26 धावा जमविताना शिवम दुबे समवेत तिसऱ्या गड्यासाठी 44 धावांची भागिदारी केली. भारताचे शतक 71 चेंडूत फलकावर लागले. 10 षटकाअखेर भारताने 3 बाद 83 धावांपर्यंत मजल मारली होती. जितेश शर्मा आणि दुबे यांनी चौथ्या गड्यासाठी 45 धावांची भागिदारी केली. भारताच्या डावातील 14 व्या षटकात अफगाणच्या मुजिबुर रेहमानने जितेश शर्माला झेलबाद केले. शर्माने 20 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा जमाविल्या. शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. शिवम दुबेने 40 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 60 तर रिंकू सिंगने 2 चौकारांसह 9 चेंडूत नाबाद 16 धावा फटकावल्या. शिवम दुबेने आपले अर्धशतक 38 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने झळकवले. भारताचे दीडशतक 104 चेंडूत फलकावर लागले. भारताच्या डावात 3 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे मुजिब उर रेहमानने 21 धावात 2 तर ए. ओमरझाईने 33 धावात 1 गडी बाद केला.

यशस्वी जैस्वाल दुखापतीमुळे बाहेर

रोहित शर्माने पहिल्या सामन्यात संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. जैस्वालला दुखापतीमुळे पहिल्या टी 20 सामन्यात खेळू शकला नाही. उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे जैस्वालने या सामन्यातून माघार घेतली आहे. वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख करत असून तो लवकरच तंदुरुस्त होईल, असे बीसीसीआयने सांगितले.

संक्षिप्त धावफलक

अफगाण 20 षटकात 5 बाद 158 (गुरबाज 23, इब्राहिम झद्रन 25, ओमरझाई 29, रेहमत शहा 3, मोहम्मद नबी 42, नजिबुल झद्रन नाबाद 19, करिम जनत नाबाद 9, अवांतर 8, मुकेशकुमार 2-33, अक्षर पटेल 2-23, शिवम दुबे 1-9).

भारत 17.3 षटकात 4 बाद 159 (रोहित शर्मा 0, शुभमन गिल 23, तिलक वर्मा 26, शिवम दुबे नाबाद 60, जितेश शर्मा 31, रिंकू सिंग नाबाद 16, अवांतर 3, मुजिब उर रेहमान 2-21, ओमरझाई 1-33).

Advertisement
Tags :

.