युवा आशियाई चषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी
अफगाणिस्तानवर 7 गडी राखून मात : सामनावीर अर्शिन कुलकर्णीची अष्टपैलू खेळी
वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरु असलेल्या युवा आशियाई चषक स्पर्धेत भारताच्या युवा टीमने दमदार सुरुवात करताना अफगाणिस्तानचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या युवा टीमचा डाव 173 धावांत आटोपला. यानंतर विजयासाठीचे आव्हान भारताने 37.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. अर्शिन कुलकर्णीने 105 चेंडूत नाबाद 70 धावा करत भारतासाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली. याशिवाय त्याने 29 धावांत 3 बळी घेण्याची किमया केली. मुशीर खाननेही नाबाद 48 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. आता, भारताची पुढील लढत रविवारी दि. 10 रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.
भारताच्या 19 वर्षांखील पुरुष संघाचे नेतृत्व उदय सहारन याच्याकडे सोपवले गेले आहे. उदयने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 50 षटकांमध्ये 173 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर जमशीद झद्रनने 43 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्यानंतर मात्र अफगाणिस्तानचा एकही फलंदाज 30 धावांपर्यंत मजल मारू शकला नाही. मोहम्मद युनूसने 26, नुमान शाहने 25 तर अक्रम मोहम्मदरजाईने 20 धावा केल्या तर तीन फलंदाज शुन्यावर बाद झाले. भारतासाठी राज लिंबानी आणि अर्शिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतल्या. नमन तिवारी याने दोन, तर मरुगन अभिषेक आणि आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
अर्शिनचे नाबाद अर्धशतक
प्रत्युत्तरात खेळताना टीम इंडियाने विजयी लक्ष्य 37.3 षटकांत पार करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. सलामीवीर अर्शीन कुलकर्णीने 4 चौकारासह नाबाद 70 धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला तर मुशीर खानने नाबाद 40 धावा करत त्याला चांगली साथ दिली. सलामीवीर आदर्श सिंग अवघ्या 14 धावा करून बाद झाला. रुद्र पाटील आणि उदय सहारनने 20 धावा करून विकेट्स गमावल्या. अफगाणिस्तानसाठी बशीर अहमद, वाहिदुल्लाह झादरान आणि खालील अहमद यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान 50 षटकांत सर्वबाद 173 (जमशीद झद्रन 43, मोहम्मद युनूस 26, नुमान शाह 25, अर्शिन कुलकर्णी व राज लिंबानी प्रत्येकी 3 बळी)
भारत 37.3 षटकांत 3 बाद 174 (आदर्श सिंग 14, अर्शिन कुलकर्णी नाबाद 70, रुद्र पाटील 20, उदय सहारन 20, मुशीर खान नाबाद 48, बशीर अहमद, खलील अहमद व वहिदउल्लाह झद्रन प्रत्येकी 1 बळी) .