भारताचा वेल्सवर विजय
वृत्तसंस्था / सॅन्टीयागो (चिली)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील 9 ते 16 स्थानासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय कनिष्ठ हॉकी महिला संघाने वेल्सचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करुन पहिल्या 10 संघात स्थान मिळविण्यासाठीचे आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.
या सामन्यात भारतातर्फे हिना बानोने 14 व्या मिनिटाला, सुनेलिता टोप्पोने 24 व्या मिनिटाला आणि इशिकाने 31 व्या मिनिटाला गोल नोंदविले. वेल्सतर्फे एकमेव गोल इलोसी मॉटने 52 व्या मिनिटाला केला. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या 30 सेकंदातच भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. दरम्यान पाचव्या मिनिटाला वेल्सला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. पण भारताची गोलरक्षक निधीने हा फटका अडविला. सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत शेवटच्या क्षणी भारताने खाते उघडले. 14 व्या मिनिटाला साक्षी राणाने दिलेल्या पासवर हिना बानोने मैदानी गोल नोंदवून भारताचे खाते उघडले. यानंतर भारतीय संघाने वेल्सवर चांगलेच दडपण आणले. 24 व्या मिनिटाला राणाने चेंडू वेल्सच्या गोलपोस्टपर्यंत नेला. पण तिला गोल करता आला नाही.
दरम्यान सुनेलिता टोप्पोने लागलीच मिळालेल्या पासवर भारताचा दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने वेल्सवर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला इशिकाने वेल्सच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत भारताचा तिसरा गोल नोंदविला. 52 व्या मिनिटाला इलोसे मॉटने मैदानी गोल करुन भारताची आघाडी थोडी कमी केली. पण शेवटी भारताने हा सामना 3-1 अशा गोलफरकाने जिंकला. आता भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचा पुढील सामना उरुग्वेबरोबर मंगळवारी होत आहे.