For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पन्नू प्रकरणानंतर बदलला भारताचा सूर

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
पन्नू प्रकरणानंतर बदलला भारताचा सूर
Advertisement

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा दावा : अमेरिकेची कठोर भूमिका कारणीभूत : मोदींच्या वक्तव्याची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था /ओटावा

भारत आणि कॅनडाच्या संबंधांमध्ये अचानक बदल दिसून येत आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटासाठी भारत सरकारच्या कर्मचाऱ्याने एका व्यक्तीशी संपर्क साधल्याचा आरोप अमेरिकेने भारतावर केल्यानंतर हा बदल घडून आला असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. आपण नेहमी आक्रमक भूमिका राखू शकत नसल्याची जाणीव बहुधा भारताला झाली असावी. भारतात सहकार्य करण्याची भावना जागृत झाली आहे. अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे भारतात हा बदल घडून येत असल्याचे ट्रुडो यांनी कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनशी  बोलताना म्हटले आहे. एक दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटाप्रकरणी वक्तव्य केले होते. फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी काही घटना अमेरिका-भारताचे संबंध बिघडवू शकत नसल्याचे नमूद केले होते.

Advertisement

भारतासोबत चांगल्या संबंधांची इच्छा

आम्ही भारतासोबत संघर्ष इच्छित नाही आणि संबंध सुधारू पाहत आहोत. आम्ही हिंद-प्रशांत रणनीतिला आणखी पुढे नेण्याची इच्छा बाळगून आहोत. परंतु कॅनडासाठी लोकांचे अधिकार, लोकांच्या सुरक्षेसाठी उभे राहणे आमचे कर्तव्य आहे. पन्नू प्रकरणी अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे भारतीय यंत्रणा तपासात सहकार्य करण्यास तयार झाल्या आहेत. आता निज्जर हत्याप्रकरणाच्या तपासातही कॅनडाला अशाचप्रकारचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळे या प्रकरणी खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकणार असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले आहे.

हरदीप सिंह निज्जर हत्याप्रकरण

18 जून रोजी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामध्ये खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती. निज्जरला भारताने फरार घोषित करत  10 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. 18 सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत यासंबंधी वक्तव्य केले होते. निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारच्या हस्तकांचा हात असू शकतो असा आरोप त्यांनी केला होता. ट्रुडो यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ ला या हत्येसाठी जबाबदार ठरविले होते.

अमेरिकेचा आरोप

न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी पन्नूवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. यात भारतीय अधिकाऱ्याचा हात होता असा दावा अमेरिकेच्या प्रशासनाने केला होता. हत्येचा कट हाणून पाडण्यात आला होता. परंतु हल्ला कुठल्या दिवशी होणार होता हे मात्र सांगण्यात आले नव्हते. जून 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतरच तेथील अधिकाऱ्यांनी भारतासमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. तर भारत सरकारने या पूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. चौकशीच्या निष्कर्षांच्या आधारावर कारवाई केली जाणार आहे. पन्नूकडे कॅनडा आणि अमेरिकेचे नागरिकत्व आहे.

Advertisement
Tags :

.