भारताचा सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय
टी-20 मालिकेत लंकेचा व्हाईटवॉश
वृत्तसंस्था/पल्लीकेली
सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी येथे झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात लंकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्यात लंका विजयी होणार असे वाटत असतानाच वॉशिंग्टन सुंदर, बिश्नॉई, रिंकू सिंग आणि सुर्यकुमार यादव यांच्या चतुरस्थ गोलंदाजीमुळे हा सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. सुपरओव्हरमध्ये लंकेने 2 बाद 2 धावा 4 चेंडूत जमविल्या. त्यानंतर सुर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
भारताने तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. मंगळवारच्या शेवटच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 9 बाद 137 धावा जमविल्या. गिलने 37 चेंडूत 3 चौकारांसह 39 तर रियान परागने 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 26 तसेच वॉशिंग्टन सुंदरने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25 धावा तसेच जैस्वालने 2 चौकारांसह 10 आणि बिस्नॉईने 1 चौकारासह नाबाद 8 धावा केल्या. भारताचा निम्मा संघ 48 धावांत बाद झाल्यानंतर गिल आणि पराग यांनी सहाव्या गड्यासाठी 54 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली. लंकेतर्फे तिक्ष्णाने 28 धावांत 3 तर हसरंगाने 29 धावांत 2, विक्रमसिंघे, असिता फर्नांडो व रमेश मेंडीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावाला दमदार सुरूवात झाली. निशांका आणि कुशल मेंडीस यांनी 8.5 षटकात 58 धावांची भागिदारी केली. निशांकाने 27 चेंडूत 5 चौकारांसह 26 तर मेंडीसने 41 चेंडूत 3 चौकारांसह 43 धावा जमविल्या. भारताच्या बिस्नॉईने लंकेचे हे दोन फलंदाज केले. निशांका बाद झाल्यानंतर कुशल मेंडीसला कुशल परेराकडून चांगली साथ लाभली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 52 धावांची भागिदारी केली. 15.2 षटकात लंकेची स्थिती 2 बाद 110 अशी भक्कम होती. रवी बिस्नॉईने मेंडीसला पायचित केल्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. यानंतर वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग आणि सुर्यकुमार यादव यांनी लंकेची तळाची फळी गुंडाळली. लंकेने आपले शेवटचे 6 गडी 22 धावांत गमविले. लंकेने 20 षटकात 8 बाद 137 धावा जमविल्याने सामना टाय झाला. लंकेच्या डावात कुशल मेंडीसने 41 चेंडूत 3 चौकारांसह 41, निशांकाने 27 चेंडूत 5 चौकारांसह 26 तर कुशर परेराने 34 चेंडूत 5 चौकारांसह 46 धावा जमविल्या. या सामन्यात भारताने शेवटच्या क्षणी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दर्जेदार केल्याने लंकेला हा सामना गमवावा लागला.
संक्षिप्त धावफलक भारत 20 षटकात 8 बाद 137 (गिल 39, पराग 26, वॉशिंग्टन सुंदर 25, दुबे 13, जैस्वाल 10, बिस्नॉई नाबाद 8,अवांतर 7, तिक्ष्णा 3-28, हसरंगा 2-29, विक्रमसिंघे, आसिता फर्नांडो, रमेश मेंडीस प्रत्येकी 1 बळी), लंका 20 षटकात 8 बाद 137 (निशांका 26, कुशल मेंडीस 43, कुशल परेरा 46, अवांतर 10, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिस्नॉई, रिंकू सिंग, सुर्यकुमार यादव प्रत्येकी 2 बळी)
सुपर ओव्हर : लंका 4 चेंडूत 2 बाद 2, भारत 0.1 षटकात बिनबाद 4