भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / गुवाहाटी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची टॉप सिडेड महिला बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा तन्वी शर्मा ही भारताची तिसरी बॅडमिंटनपटू आहे.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तन्वी शर्माने लियुचा 15-11, 15-9 असा फडशा पाडला. आता तन्वीचा अंतिम सामना थायलंडच्या द्वितीय मानांकीत अनयापत पिचीतप्रेशक बरोबर होणार आहे. थायलंडच्या पिचीतप्रेशकने आपल्याच देशाच्या केटकेलिंगचा 10-15, 15-11, 15-5 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेच्या इतिहासात तब्बल 17 वर्षांनंतर भारताला तन्वी शर्माकडून पहिले पदक मिळत आहे.या स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी भारताच्या माजी टॉपसिडेड सायना नेहवाल आणि अपर्णा पोपट यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
या स्पर्धेत पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात इंडोनेशियाच्या मोहम्मद झाकीने चीनच्या हेंगचा 14-16, 16-14, 15-12 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना सुमारे 65 मिनिटे चालला होता. महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत थायलंडच्या पी. अनयापतने आपल्याच देशाच्या केटकेलिंगचा 10-15, 15-11, 15-5 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.