For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संरक्षण उत्पादनात भारताची भरारी

06:36 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
संरक्षण उत्पादनात भारताची भरारी
Advertisement

संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये भारताला अलीकडच्या काळामध्ये मोठी कामगिरी करता आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 1.27 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनाची निर्मिती करण्यामध्ये भारताने यश मिळविले आहे. हा एक प्रकारचा उत्पादन निर्मितीतला विक्रमच मानला जात आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी शुक्रवारी संरक्षण उत्पादनांच्याबाबतीत ही माहिती दिली. जागतिक स्तरावरती संरक्षण उत्पादनामध्ये भारताला अग्रस्थानावर आणण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.

Advertisement

‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे भारताने या संधीचा लाभ घेत संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीमध्ये झोकून देण्याचे काम केले आहे. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेला जास्तीत जास्त बळ देण्याचा प्रयत्न केला. केवळ संरक्षण उत्पादनांनाच प्रोत्साहन दिलेले नसून ऑटोमोबाईलसह इलेक्ट्रॉनिक उत्पादने (मोबाईल व इतर) निर्मितीसाठी देखील सरकारने आवश्यक ते सहकार्य दिलेले आहे. याकरिता सरकारने पीएलआय म्हणजेच उत्पादनासाठी प्रोत्साहनात्मक सवलतीची योजना जाहीर केल्यानंतर विदेशातील कंपन्यासुद्धा भारतामध्ये आपले बस्तान बसवू लागल्या आहेत. मोबाईल निर्मितीसह निर्यातीमध्ये भारताचा वाटा अलीकडच्या वर्षामध्ये वेगाने वाढतो आहे. ‘मेक इन इंडिया’चा लाभ घेत संरक्षण क्षेत्रातसुद्धा भारताने उत्पादनात विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. 2023-24 आर्थिक वर्षात 1.27 लाख कोटी रुपयांची संरक्षण उत्पादने करण्याचा विक्रम भारताने केला आहे.

या आधीच्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 मध्ये 1 लाख 8 हजार 684 कोटी रुपयांची संरक्षण उत्पादने तयार करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी लख्ख अशीच होते आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि खासगी कंपन्यांच्या माध्यमातून वरील संरक्षण उत्पादने तयार करण्यात आली आहेत. मागच्या आर्थिक वर्षाच्या उत्पादनाच्या तुलनेमध्ये यंदा 16 टक्के वाढ करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘मेक इन इंडिया’ उपक्रम नवनवे किर्तीमान रचू पाहत आहे. सिंग यांनी ‘एक्स’वर मत नोंदवताना भारताने 2023-24 मध्ये संरक्षण उत्पादनात मूल्याच्या तुलनेत पाहता सर्वाधिक वृद्धी नोंदवली आहे. ही बाब नक्कीच प्रशंसनीय अशी आहे. आगामी काळातही उत्पादनामध्ये अशीच प्रगती राखली जाणार आहे, असे म्हटले आहे.

Advertisement

गेल्या दहा वर्षामध्ये मोदी यांनी आत्मनिर्भरतेवर भर देण्यासाठी केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सार्वजनिक तसेच खासगी कंपन्यांनी संरक्षण उत्पादनाच्या निर्मितीमध्ये मोलाचा सहभाग नोंदवला आहे. विदेशी संरक्षण उत्पादनांच्या आयातीपेक्षा सदरच्या उत्पादनांच्या निर्मितीवर भारताने अलीकडच्या वर्षांमध्ये भर दिलेला पाहायला मिळाला आहे. एवढेच नाही तर संरक्षण उत्पांदनाची नुसती निर्मिती न करता याची निर्यातही इतर देशांना भारताने केलेली आहे. ही बाबसुद्धा वाखाणण्याजोगी म्हणता येईल. 2023-24 आर्थिक वर्षात संरक्षण उत्पानांच्या निर्यातीत 32 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 21083 कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनांची विक्रमी निर्यात करण्यात आली आहे. यामागच्या आर्थिक वर्षामध्ये 15920 कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनांची भारताने निर्यात केली होती.

गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत संरक्षण उत्पादनांच्या मूल्यामध्येसुद्धा भरघोस अशी वाढ केली गेली आहे. 2019-20 पासून पाहिल्यास संरक्षण उत्पादनांच्या मूल्यामध्ये 60 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. देशांतर्गत उत्पादनावर त्याचप्रमाणे निर्यातीसाठी सरकारने सकारात्मक धोरणाची अंमलबजावणी केलेली आहे. याचा लाभ विविध सार्वजनिक संस्था कंपन्यांनी उचललेला आहे. संरक्षण क्षेत्राकरितासुद्धा पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिल्याने त्यातही भारताने स्पृहणीय यश संपादन केलेले आहे. उत्पादनाच्या तुलनेत निर्यातीत गेल्या दोन वर्षात 700 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 213 दशलक्ष डॉलर्सच्या संरक्षण उत्पादनांची निर्यात केली गेली. या तुलनेत 2018-19 आर्थिक वर्षात 1.5 अब्ज डॉलर्सच्या उत्पादनाची निर्यात केली गेली. 35 हजार कोटींच्या संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीचे लक्ष पुढील काळात सरकारने ठेवलेले आहे. भारत संरक्षणविषयक उत्पादने 30 हून अधिक देशांना निर्यात करतो. यामध्ये अमेरिका, थायलंड, मलेशिया, श्रीलंका, बांगलादेश, जर्मनी, बेल्जीयम, टर्की, इजिप्त, ओमान, इस्त्रायल, केनिया, नायजेरिया, चिली यासारख्या देशांचा समावेश आहे. संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीमध्ये भारत डायनॅमिक्स, डीआरडीओ, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, कोचिन शिपयार्ड, भारत फोर्ज, टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझगाव डॉक शिपबिल्डिंग यासह इतर भारतीय कंपन्यांचा वाटाही लक्षणीय राहिला आहे.

Advertisement
Tags :

.