कॅनडासंबंधातील भारताची भूमिका योग्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनडाच्या दूतावास अधिकाऱ्यांची भारत सरकारने केलेली हकालपट्टी योग्यच आहे, असा निर्वाळा बहुतेक भारतीयांनी दिला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने यासंबंधी देशव्यापी सर्वेक्षण नुकतेच केले आहे. त्या सर्वेक्षणाचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार 86.45 टक्के भारतीयांनी भारत सरकारची भूमिका योग्य असल्याचे मत व्यक्त केले, अशी माहिती देण्यात आली.
हे सर्वेक्षण 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आले होते. ‘खलिस्तानवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप भारताने कॅनडावर केला आहे. तसेच भारताने कॅनडाच्या सहा उच्चायोग अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा आदेशही दिला आहे. भारताची ही कृती योग्य आहे, असे आपणास वाटते काय,’ असा प्रश्न सर्वेक्षणात भाग घेतलेल्यांना विचारण्यात आला होता. 86.45 टक्के लोकांनी भारताची भूमिका योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. केवळ 13.55 टक्के लोकांनी ही भूमिका अयोग्य असल्याचे किंवा आम्हाला यासंबंधी काहीही म्हणायचे नाही, असे उत्तर दिले. या वृत्तसंस्थेने या सर्वेक्षणाच्या आधारे काढलेल्या निष्कर्षात, कॅनडाच्या संदर्भात भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या धोरणाला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट दिसून येते, असे प्रतिपादन केले आहे.