विश्वविक्रमी विजयासह भारताचा मालिकाविजय
मायदेशातील 14 वा मालिकाविजय, रिंकू सिंग, जैस्वाल, गायकवाडची फटकेबाजी, सामनावीर अक्षर पटेलचे 3 बळी
वृत्तसंस्था/ रायपूर
येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. कर्णधार या नात्याने सूर्यकुमार यादवने मिळविलेला हा पहिलाच मालिकाविजय आहे. 16 धावांत 3 महत्त्वाचे बळी टिपणाऱ्या अक्षर पटेलला सामनावीराचा बहुमान मिळाला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 174 धावा केल्या. सलामीच्या जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आणि नंतर पाठोपाठ विकेट पडल्यानंतर रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांनी डावाची धुरा सांभाळत संघाला पावणेदोनशेचा टप्पा गाठून दिला. 175 धावांच्या तुलनेने माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही आणि त्यांना 20 षटकांत 7 बाद 154 धावांवर रोखत भारताने शानदार विजय साकार करून मालिकाविजय निश्चित केला.
ट्रेव्हिस हेड व जोश फिलिप यांनी 3.1 षटकांत 40 धावांची सलामी दिली. पण ही जोडी फुटल्यानंतर त्यांच्या डावाची पडझड सुरू झाली आणि ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. बिश्नोईने फिलिपचा त्रिफळा उडविल्यानंतर अक्षर पटेलने धोकादायक ठरू पाहणाऱ्या हेडला मुकेश कुमारकरवी झेलबाद केले. पटेलने नंतर अॅरॉन हार्डी व बेन मॅकडरमॉट यांना त्रिफळाचीत केल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती 11.2 षटकांत 4 बाद 87 अशी झाली. टिम डेव्हिड व मॅथ्यू शॉर्ट यांनी थोडाफार प्रतिकार केला. चहरने डेव्हिडला 19 धावांवर बाद केले व नंतर शॉर्टलाही त्यानेच बाद केले. हे दोन्ही झेल जैस्वालने टिपले. 16.4 षटकांत ऑस्ट्रेलियाने 6 बाद 126 धावा जमविल्या होत्या. धावगती आवाक्याबाहेर गेल्याने ऑस्ट्रेलियाला फटकेबाजी करावी लागली आणि त्यात त्यांचे गडी बाद होत गेले. कर्णधार वेडने 23 चेंडूत नाबाद 36 धावा फटकावल्या. त्यांच्या डावातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याशिवाय हेडने 16 चेंडूत 31, शॉर्टने 19 चेंडूत 22, मॅकडरमॉट व डेव्हिड यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. दीपक चहरने 2, बिश्नोई, अवेश यांनी एकेक बळी मिळविला. या मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना रविवारी 3 डिसेंबर रोजी बेंगळूरमध्ये होणार आहे.
भारताची चांगली सुरुवात
प्रारंभी, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी मिळून 6 षटकात 50 धावा जोडल्या.
अॅरॉन हार्डीने जैस्वालला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. यशस्वीने 28 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 37 धावा केल्या. यशस्वीनंतर भारताने श्रेयस अय्यर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांची विकेट स्वस्तात गमावली. चौथ्या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या अय्यरने 8 धावा केल्या तर कर्णधार सूर्यकुमारला केवळ एकच धाव करता आली.
रिंकू-जितेशची फटकेबाजी
63 धावांवर 3 विकेट पडल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग यांच्यात 48 धावांची भागीदारी झाली. यामुळे भारतीय डावाला गती मिळाली. ऋतुराजने 28 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 32 धावा केल्या. ऋतुराज बाद झाल्यानंतर रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांनी तुफानी फलंदाजी करत भारताला दीडशेचा टप्पा गाठून दिला. या दोघांमध्ये 56 धावांची भागीदारी झाली. भारताकडून रिंकू सिंगने 28 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह सर्वाधिक 46 धावा केल्या. तर जितेशने अवघ्या 19 चेंडूत 35 धावांची खेळी केली. जितेशच्या खेळीत 3 षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.
शेवटच्या दोन षटकांत मात्र पाच विकेट गेल्यामुळे भारताच्या धावसंख्येला लगाम बसला. भारताला 20 षटकांत 9 बाद 174 धावा करता आल्या. अक्षर पटेल आणि दीपक चहर यांनी शुन्य धावांवर विकेट्स गमावल्या. रवी बिश्नोई याने 4, तर आवेश खान 1 धावेवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियासाठी बेन ड्वारशुईसने 4 षटकात 40 धावा खर्च करून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तनवीर सांघा आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. अॅरॉन हार्डीनेही एक विकेट घेतली.
ऋतुराज गायकवाडच्या टी-20 मध्ये जलद 4000 धावा
सलामीवीर जैस्वालच्या (37) रुपात भारताने पहिली विकेट गमावल्यानंतर ऋतुराज गायकवाड काही काळ खेळपट्टीवर टिकला. पण वैयक्तिक 32 धावांचे योगदान दिल्यानंतर त्याने विकेट गमावली. त्याला ही खेळी अर्धशतकात बदलता आली नाही. पण यादरम्यान त्याने टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या. भारताकडून यापूर्वी हा पराक्रम केएल राहुलने केला होता. त्याने 117 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. ऋतुराजने हा पराक्रम 116 डावांमध्ये केला. विशेष म्हणजे, भारतीय फलंदाजांच्या यादीत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 4000 धावा करणाऱ्यांच्या यादीत ऋतुराजने पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या स्थानी केएल राहुल (117) असून विराट कोहली (138) तिसऱ्या स्थानी आहे.
‘टी-20 मध्ये भारतच किंग’ : नवा विश्वविक्रम
भारताचा हा मायदेशातील चौदावा टी-20 मालिकाविजय असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच त्यांना शेवटचा मालिकापराभव स्वीकारला होता. तसेच सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मागे टाकत भारताने नवा विश्वविक्रम नोंदवला आहे. भारताचे आता 213 सामन्यांत 136 विजय झाले असून पाकने 226 सामन्यात 135, न्यूझीलंडने 200 सामन्यात 102, ऑस्ट्रेलियाने 181 सामन्यात 95, द.आफ्रिकेने 171 सामन्यात 95, इंग्लंडने 177 सामन्यांत 92, लंकेने 180 सामन्यात 79 विजय मिळविले आहेत.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकांत 9 बाद 174 (यशस्वी जैस्वाल 37, गायकवाड 32, रिंकू सिंग 46, जितेश शर्मा 35, ड्वारशुईस 3 तर बेहरेनडॉर्फ, सांघा प्रत्येकी दोन बळी).
ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 7 बाद 154 : मॅथ्यू वेड 23 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 36, हेड 16 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 31, शॉर्ट 19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 22, डेव्हिड 20 चेंडूत 19, मॅकडरमॉट 22 चेंडूत 19, अवांतर 8. अक्षर पटेल 3-16, बिश्नोई 1-17, चहर 2-44, आवेश खान 1-33